जिंगल बेलच्या धूनवर नाताळची धूम
By admin | Published: December 26, 2015 12:20 AM2015-12-26T00:20:58+5:302015-12-26T00:25:28+5:30
विविध कार्यक्रम उत्साहात : देशातील शांतता, सुरक्षिततेसाठी ख्रिश्चन बांधवांची प्रार्थना
कोल्हापूर : ‘हॅपी ख्रिसमस,’ ‘मेरी ख्रिसमस’ असे शुभसंदेश, विविध भेटवस्तूंचे वाटप, शांततेसाठी प्रार्थना सभांचे आयोजन, फटाक्यांची आतषबाजी, चर्चसह घरांना केलेली आकर्षक विद्युत रोषणाई अशा जल्लोषी वातावरणात ख्रिश्चन बांधवांनी शुक्रवारी नाताळचा सण उत्साहात साजरा केला.
शुक्रवारी रात्री बारा वाजता आतषबाजी करून ख्रिश्चन बांधवांनी प्रभू येशू जन्माचे स्वागत केले. यानंतर मध्यरात्रीपासूनच सर्व चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. न्यू शाहूपुरीतील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून नाताळच्या प्रार्थनेला सुरुवात झाली. या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत इंग्रजी उपासना व मराठी प्रार्थना घेण्यात आल्या. या ठिकाणी पास्टर रेव्हरंड डी. बी. समुद्रे आणि रेव्हरंड जे. ए. हिरवे यांनी विशेष प्रार्थना करून संदेश दिला. क्वायर ग्रुपतर्फे गीतगायन करण्यात आले. विक्रमनगर चर्चमध्ये रेव्हरंड आर. आर. मोहिते यांनी संदेश दिला. येथील विविध कार्यक्रमांचे संयोजन रेव्हरंड संजय धनवडे, अमोल कदम यांनी केले. नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्च येथे रेव्हरंड बी. जे. मोरे यांनी संदेश दिला. ब्रह्मपुरी येथील पवित्र उपासना मंदिर आणि रेसिडेन्सी क्लब येथील आॅल सेंट चर्च येथे रेव्हरंड एस. एम. गोगटे यांनी संदेश दिला. होलीक्रॉस चर्चसह अन्य चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले होते. ख्रिश्चन बांधवांनी दिवसभर एकमेकांच्या घरी जाऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या घरोघरी, दुकानांमध्ये आकर्षकपणे ख्रिसमस ट्री सजविण्यात आले होते. ख्रिसमससाठी केलेले खास केक, प्लम केक खरेदीसाठी केक शॉप्स, बेकरीमध्ये गर्दी दिसून आली.
देशाचा कारभार नीट चालावा
देशातील शांतता व सुरक्षिततेसह राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना देशाचा कारभार नीटपणे करता यावा, यासाठी शहरातील चर्चमध्ये प्रार्थना करण्यात आल्या. तसेच वायल्डर मेमोरियल चर्चतर्फे कळंबा कारागृहातील कैद्यांनी सुधारावे. त्यांनी पुढील आयुष्य चांगल्या मार्गाने व्यतीत करावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. याठिकाणी अनिल जाधव, प्रताप मनपाडळे यांनी संदेश दिला, असे कोल्हापूर चर्च कौन्सिलचे कार्यकारिणी सदस्य आनंद म्हाळुंगेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संदेशांची गर्दी
‘विश यू मेरी ख्रिसमस,’ ‘नाताळ आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा,’ ‘हॅपी ख्रिसमस,’ ‘मेरी ख्रिसमस’ अशा लिखित तसेच सांताक्लॉज, ख्रिसमस ट्रीच्या छायाचित्रांसह असलेल्या शुभेच्छा संदेशांनी दिवसभर व्हॉट्स-अॅप, हाईक, फेसबुक या सोशल मीडियावर गर्दी केली होती. अन्य समाजांतील बांधवांनीही ख्रिश्चन बांधवांना प्रत्यक्ष भेटून, मोबाईलवर शुभेच्छा दिल्या.