.जोतिबा यात्रेसाठी डोंगर फुलला, यात्रेचा उद्या मुख्य दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2017 06:12 PM2017-04-09T18:12:54+5:302017-04-09T18:12:54+5:30

चांगभलंच्या गजराने गुलालाची उधळण : मानाच्या सासनकाठ्याही दाखल

For the Joti Yatra, the mountain is full, the main day of Yatra tomorrow | .जोतिबा यात्रेसाठी डोंगर फुलला, यात्रेचा उद्या मुख्य दिवस

.जोतिबा यात्रेसाठी डोंगर फुलला, यात्रेचा उद्या मुख्य दिवस

googlenewsNext

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : चांगभलं चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण करीत श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला रविवारी प्रारंभ झाला. सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. रविवारी पहाटेपासूनच हलगीच्या ठेक्यावर डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेशसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्यांसह रविवारी दाखल झाल्याने डोंगर अक्षरश: फुलून गेला आहे.

रविवारी सायंकाळी मानाची निनाम पाडळी (जि. सातारा), किवळ (कऱ्हाड), मौजे विहे (ता. पाटण, सातारा), कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) या मानाच्या सासनकाठ्यांचे यमाई मंदिरात मिरवणुकीने आगमन झाले. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक भक्तांनी उन्हापासून संरक्षणासाठी सावली धरून आडोसा घेतल्याचे चित्र दिसत होते.

पंचगंगेचा परिसर भाविकांनी फुलला

दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीने पंचगंगा घाट बहरून गेला आहे. भाविकांची गर्दी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि प्रशासनातर्फे घाटावर देण्यात आलेल्या सोयी-सुविधांमुळे घाटाला यात्रेचे स्वरूप आले आहे.

दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला जाण्यासाठी देशातील विविध राज्यांतून भाविक जोतिबाला येतात. तिथे जाण्यापूर्वी अनेक भाविक पंचगंगा नदीघाटावर थांबतात. मैलोन्मैल चालत आल्याने आलेला शीण घालविण्यासाठी पंचगंगेच्या पात्रामध्ये स्नान केल्यानंतर भाविक ‘दख्खनच्या राजा’च्या भेटीसाठी पुढे मार्गस्थ होतात. त्यामुळे रविवारी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे पंचगंगा घाटावर दाखल होत होते.

सासनकाठी नाचवत, ‘चांगभलं’चा गजर आणि गुलालाची उधळण करीत हे भाविक पंचगंगा घाटाकडे येत होते. भाविकांच्या सोईसाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल नदीघाटावर उभारण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीनेही घाटावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्यावतीने यात्रेकरूंच्या सोयीसाठी येथे बूथ उभारला आहे; तर आपत्कालीन परिस्थितीत तसेच नदीत स्नान करणाऱ्या भाविकांना काही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अग्निशमन दलाचा बंब आणि जवान तैनात करण्यात आले आहेत.

एस. टी.च्या कोल्हापूर विभागाकडून येथे तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. या ठिकाणाहून यात्रेसाठी दर मिनिटाला एक याप्रमाणे एस. टी. बस सोडली जात आहे. पोलिस दलाच्या वतीने या ठिकाणीही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्याचे काम पोलिस दल करीत आहे. परगावांतून आलेल्या खासगी वाहनांचे ताफे या घाटावर उभे होते. दिवसभर घाटावर ‘चांगभलं’चा गजर करीत, सवाद्य सासनकाठ्या, भगवे झेंडे घेऊन भाविक खासगी वाहनांतून येत होते. त्यानंतर स्नान करून पुन्हा जोतिबा डोंगराच्या दिशेने पायी, खासगी वाहनांतून जात होते. त्यामुळे कोल्हापूर-पन्हाळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली होती.

पंचगंगा घाटावर स्नानाची परंपरा


जोतिबा डोंगरावर देवदर्शन करण्यासाठी जाण्यापूर्वी कोल्हापुरात पंचगंगा घाटावर भाविकांनी स्नान करून देव्हाराच्या टाकांचे पूजन करून डोंगरावर जाण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. रविवारी दिवसभर पंचगंगा नदीघाटावर स्नान करण्यासाठी तसेच देवाचे टाक पूजन करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती.

शिवाजी चौक तरुण मंडळाचे अन्नछत्र
शिवाजी चौक तरुण मंडळाकडून रविवार, सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस मोफत अन्नछत्र चालविले जात आहे. रविवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते अन्नछत्राचे उद्घाटन झाले. तसेच शिवाजी तरुण मंडळाकडून येथे पिण्याच्या पाण्याचाही स्वतंत्र स्टॉल सुरू करण्यात आला आहे. अन्नछत्रातील प्रसादाचा लाभ भाविक शिस्तबद्धरीत्या घेत आहेत. या अन्नछत्राचे हे २३ वे वर्ष आहे.

‘प्रजासत्ताक’च्या वतीने मोफत पाणीवाटप


प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने सेंट्रल प्लाझा या ठिकाणी २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. याकरिता सुशील कोरडे, दिलीप देसाई हे कार्यरत आहे. यंदा सेवेचे हे नववे वर्ष आहे.

चारचाकी बिघडली तर मोफत सेवा


कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर वर्कशॉप ओनर वेल्फेअर असोसिएशनतर्फे चैत्र यात्रेस येणाऱ्या भाविकांची चारचाकी नादुरुस्त अथवा पंक्चर झाल्यास ती मोफत दुरुस्त करून दिली जाणार आहे. हा उपक्रम रविवारी सकाळपासून सुरू होणार असून, तो सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. ही सेवा एम.टी.डी.सी. रिसॉर्ट कॉर्नर, गिरोली फाटा (यमाई मंदिराची मागील बाजू), खालील वाहनतळ, गायमुखाजवळ अशा चार ठिकाणी ही सेवा अखंडितपणे सुरू राहणार आहे.

Web Title: For the Joti Yatra, the mountain is full, the main day of Yatra tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.