येत्या मंगळवारी जोतिबाची चैत्र यात्रा; प्रशासनाची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 06:08 PM2024-04-19T18:08:51+5:302024-04-19T18:09:06+5:30
जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा मंगळवारी (दि. २३) होत असून, सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासकीय ...
जोतिबा : दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा मंगळवारी (दि. २३) होत असून, सर्व शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी जोतिबा डोंगरावर येऊन प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी करीत आहेत. संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कामातील त्रुटींवर सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या जात आहेत.
जोतिबा चैत्र यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आल्या असून बैठकीत केलेल्या सूचनांची प्रत्यक्ष पाहणी प्रशासकीय अधिकारी करीत आहेत. गटविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा यांनी वसुंधरा शौचालये, रंगकाम व स्वच्छता, भक्तांची निवास व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन यांच्यामार्फत प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांना निर्भेळ प्रसाद विक्री करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दुग्धजन्य पदार्थ विकणाऱ्यांना प्रत्येक पॅकवर उत्पादन तिथी लिहूनच विक्री करण्याचे आदेश दिलेले आहेत. उघड्यावर ठेवलेले पेढे विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
उपविभागीय अधिकारी, देवस्थान सचिव, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यामार्फत चैत्र यात्रा नियोजन आढावा घेण्यात आला. यावेळी पायरी मार्गांवरील दुकानदारांना पेढा, मिठाई, गुलाल, प्लास्टिक बंदी, अतिक्रमणाबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. यावेळी श्री यमाई मंदिर परिसरातील पार्किंग, स्वच्छता, पाणी या बाबींची पाहणी करण्यात आली. ठाकरे मिटके गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कचरे गल्ली या ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.