जोतिबाच्या खेटे यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:34 AM2019-03-18T00:34:05+5:302019-03-18T00:34:09+5:30
जोतिबा : जोतिबा मंदिर येथे चौथ्या रविवारच्या खेट्याने खेटे यात्रेची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. पहाटेच्या वेळी ‘चांगभलं’च्या गजराने अवघी ...
जोतिबा : जोतिबा मंदिर येथे चौथ्या रविवारच्या खेट्याने खेटे यात्रेची पारंपरिक पद्धतीने सांगता झाली. पहाटेच्या वेळी ‘चांगभलं’च्या गजराने अवघी दख्खननगरी दुमदुमली. श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर पहाटेपासून भाविकांची गर्दी झाली. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख तीर्थ मार्गे पायी चालत खेटेकरी भाविक जोतिबा मंदिरात दाखल झाले. ‘चांगभलं’चा गजर करीत भाविकांनी दर्शन घेतले. चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था, मंडळे यांनी प्रसाद वाटप केला.
सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक झाला. मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला. केरबा उपाध्ये, शरद बुरांडे, बंडा उमराणी, सूरज उपाध्ये, प्रकाश उपाध्ये यांनी मंत्रपठण केले. सुनील भिवदर्णे यांनी जोतिबाची अलंकारित बैठी महापूजा बांधली. सकाळी ११ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजमासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत धुपारतीचे दर्शन घेतले.
पुजारी वर्गाचे सेवाभावी कार्यकर्ते, गनिमी कावा कोडोलीचे कार्यकर्ते, पुजारी समिती देवस्थान समिती व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक हजर होते. रात्री ८ वाजता जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. पालखीवर गुलाल, खोबऱ्यांची उधळण झाली. रात्री ११ पर्यंत भाविक जोतिबा मंदिरात येत होते. माघ पौर्णिमा ते होळी पौर्णिमा दरम्यान येणारे हे खेटे रविवारी असतात. काही भाविक पारंपरिक पद्धतीने खेटेची सांगता करतात, तर काही भाविक पाच रविवार खेटे करून सांगता करतात.
मंदिराभोवती पाच पदरी रांगा
चौथ्या खेट्याला भाविकांमुळे मंदिरा- सभोवती चार-पाच पदरी दर्शनरांगा लागल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, कºहाड भागातील भाविकांबरोबरच कर्नाटक राज्यातील भाविक सहभागी होते. दर्शनरांगेवर नियंत्रणासाठी कोडोली पोलीस स्टेशनचे सपोनि संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तैनात होते.