‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा खेटे यात्रेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2017 12:46 AM2017-03-14T00:46:50+5:302017-03-14T00:46:50+5:30
दोन लाख भाविक : पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी गर्दी; गुलाल, खोबऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण
जोतिबा : दोन लाख भाविकांच्या उपस्थितीत जोतिबा खेटे यात्रेची सांगता झाली. होळी पोर्णिमा, पाचवा खेटा, सलग सुटीच्या पर्वणीमुळे भाविकांची जोतिबा दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. पेठवडगाव यादव प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.
जोतिबा डोंगरावर ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात रविवार खेटे यात्रेची सांगता झाली. पाचव्या खेटेला भाविकांनी पहाटेपासूनच जोतिबा दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली. पाद्यपूजा, काकड आरती, अभिषेक विधी सकाळी संपन्न झाला. कोल्हापूर ते जोतिबा पायी प्रवास करीत आलेल्या भाविकांना मंदिरात अल्पोपहार वाटप करण्यात आला. सकाळी ११ वा. जोतिबाचा धुपारती सोहळा निघाला. गुलाल खोबरे उधळून ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात धुपारतीचे भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवक या लवाजम्यासह देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सिंधिया देवस्थानचे प्रभारी आर. टी. कदम, धुपारती सोहळ्यात सहभागी झाले होते. जोतिबा मंदिराभोवती चार पदरीची दर्शन रांग दुपारनंतर मिटके आणि ठाकरे गल्लीपर्यंत पोहोचली होती. कोडोली पोलिस ठाण्याचे स.पो.नि. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता. जोतिबा मंदिरात पेठवडगावच्या यादव प्रतिष्ठानच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पाच खेटे पूर्ण करणाऱ्या भाविकांनी जोतिबा देवास अभिषेक, पोषाख, पुरण-पोळीचा नैवेद्य करून खेटेची सांगता केली.
जोतिबा मंदिर परिसरात भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. ‘चांगभलंऽऽ’च्या गजरात भाविकांनी जोतिबा उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले. होळी पौर्णिमानिमित्त होळी पूजनाचा विधी झाला. रात्री अकरापर्यंत भाविक दर्शनासाठी येत होते. (वार्ताहर)
पाचवा खेटा, होळी पौर्णिमा आणि सलग सुटीच्या पर्वणीमुळे जोतिबा दर्शनासाठी भाविकांची झालेली अलोट गर्दी झाली होती. दुसऱ्या छायाचित्रात जोतिबा देवाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आलेली होती.