जोतिबाचा सरता रविवार उत्साहात; आता पालखी सोहळा चार महिने बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 01:59 PM2023-06-05T13:59:45+5:302023-06-05T14:00:03+5:30
लाखो भाविकांनी केली गुलाल खोबऱ्यांची उधळण
जोतिबा : जोतिबा देवाचा सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण केली. आता पालखी सोहळा चार महिने बंद असून, खंडेनवमीला पालखी सोहळा निघणार आहे.
जोतिबा मंदिरात सरता रविवारनिमित्त सकाळी देवास पंचामृत व आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. श्री जोतिबा देवाची सरता रविवार उत्सव महापूजा बांधली. वैशाख महिना आणि मेची सुटीमुळे दर्शनासाठी भाविकांनी जोतिबा दर्शन मंडपात दोन मजली रांगा लावल्या होत्या. वावरजत्राची संख्या लक्षणीय होती. नववधूबरोबर परिवारासह पाहुणे यांची ही जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि शीतल डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैणात होता. सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला.
भाविकांनी गुलाल-खोबऱ्यांची उधळण करून धुपारतीचे दर्शन घेतले. दुपारी तीन वाजता अभिषेक करून जोतिबा देवाची सरदारी पगडी महापूजा बांधली. रात्री आठ वाजता महाघंटेचा नाद होताच श्री जोतिबाचे मुख्य पुजारी, उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला.
देवस्थान समितीचे नूतन प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झगर, सरपंच राधा बुणे, पोलिस पाटील बाळासाहेब पाटील, तसेच मानाचे गावकरी उपस्थित होते. भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर-पेढे वाटले. घरोघरी आमरस नैवेद्य करण्यात आला. विष्णू सातार्डेकर, अंकुश सातार्डेकर यांनी पालखी सदरेवर आकर्षक कमानीची सजावट केली.
पालखी सोहळा चार महिने बंद
जोतिबा देवाचे उंट, घोडे विश्रांतीसाठी पोहाळेत जाणार. जोतिबाचा पालखी सोहळा चार महिने बंद राहणार असून आता खंडेनवमीला निघणार असल्यामुळे उंट, घोडे चार महिने विश्रांतीसाठी जोतिबा डोंगरच्या पायथ्याशी पोहाळे गावात सोमवारपासून जाणार आहे.