जोतिबा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देऊ:चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:47 AM2019-02-04T00:47:58+5:302019-02-04T00:48:03+5:30
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, त्याबरोबरच जोतिबावर अन्य लहान-मोठी विकासकामे ...
जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, त्याबरोबरच जोतिबावर अन्य लहान-मोठी विकासकामे लोकसहभागातून केली जातील, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे केली.
श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या नियोजित दर्शन मंडप, स्वच्छतागृह उभारणीच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार संभाजीराजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित पाटील, आमदार चंद्रदीप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक, अंजली चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सरपंच डॉ. रिया सांगळे उपस्थित होते.
श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा २५ कोटींचा तयार केला असून, शासनाने पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित निधीही प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकासाची अनेकविध कामे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हाती घेतली असून, यापुढेही जोतिबा तीर्थक्षेत्र विकासाची कामे निश्चितपणे मार्गी लागतील.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधीतून १०५०० चौ. फूट क्षेत्रावर ३ मजली दर्शन मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मजल्यावर हॉलसह पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा समावेश आहे. नियोजित स्वच्छतागृहांच्या प्रकल्पामध्ये पुरुषांसाठी ३६ बाथरूम व २४ स्वच्छतागृहे, तर महिलांसाठी ३६ बाथरूम व २४ स्वच्छतागृहे, बेसीन, लॉकर्स, वेटिंग रूम, सोलर तसेच वॉच टॉवर अशा सुविधा स्वतंत्रपणे उभारल्या जाणार आहेत. श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणाºया विविध विकासकामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पवार यांनी स्वागत केले. सदस्या संगीता खाडे यांनी आभार मानले. समारंभास पंचायत समितीचे सभापती अनिल कंदुरकर, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, बी. एन. पाटील-मुगळीकर, संगीता खाडे, संदीप देसाई, अजितसिंह काटकर, माणिक पाटील-चुयेकर, बाबासाहेब पाटील, प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार अनंत गुरव, राजेंद्र सावंत, सुदेश देशपांडे, अधिकारी, नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.