Navratri2022: जोतिबाची सोहन कमळ पुष्पामध्ये सालंकृत महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:17 PM2022-09-28T12:17:58+5:302022-09-28T12:21:50+5:30
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली.
जोतिबा: नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबा दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला जोतिबाची तीन कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा बांधली.
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला निमित सोहन कमळातील महापूजा श्रीचे पुजारी देवराज मिटके, अंकुश दादर्णे, बाळू सांगळे, विजय भंडारे, श्रीचरण झुगर यांनी बांधली. सकाळी १० वाजता यमाई मंदिराकडे वाजत गाजत धुपारती सोहळा निघाला. उंट, घोडे, वाजंत्री देव सेवक श्रीचे पुजारीसह नवरात्र उपासकाचा लवाजमा सहभागी झाला होता.
नवरात्रोत्सवात सलग दहा दिवस हा धुपारती सोहळा निघतो. दुसऱ्या माळेलाच भाविकांनी जोतिबा दर्शनासाठी मोठी गर्दी केली. तेल अर्पण करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची गर्दी झाली होती. दर्शन मंडपमध्ये भाविकांच्या दर्शन रांगा लागल्या होत्या. दर्शन रांग नियंत्रणासाठी कोडोली पोलीस स्टेशनचे पोलीस, देवस्थान समितीचे कर्मचारी व सुरक्षारक्षक, जोतिबा पुजारी समितीचे कर्मचारी स्थानिक पुजारी तैनात होते. वाहन पार्किंग जागेवर खासगी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. एसटी महामंडळाने जादा गाड्यांची सोय केली. कर्नाटक डेपोच्याही गाड्या मोठ्या प्रमाणात होत्या. तेल, नारळ, मेवा, मिठाईची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.