जोतिबा विकास प्राधिकरण अन् पन्हाळ्यावरील वास्तूंची पुनर्बांधणी होणार; मुंबईतील बैठकीत निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 01:31 PM2023-01-05T13:31:54+5:302023-01-05T13:45:57+5:30
पन्हाळा किल्ल्यावरील ज्या वास्तू नामशेष झाल्या आहेत किंवा होत आहेत त्यांची पुनर्बांधणी
कोल्हापूर : जोतिबासह परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जोतिबा विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुधवारी झालेल्या मुंबईतील बैठकीत घेण्यात आला. पन्हाळा किल्ल्यावरील वास्तूंची पुनर्बांधणीही करण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली.
कोरे म्हणाले, जोतिबा डोंगर परिसरात २८ गावे आहेत. करवीर, पन्हाळा आणि हातकणंगले तालुक्यातील गावांचा यामध्ये समावेश आहे. या परिसरात असलेल्या हजारो एकर वन, देवस्थान, वर्ग दोन, मुलकीपड, गायरान अशा जमीनींचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये वनीकरणापासून जलसंधारणापर्यंतची अनेक कामे घेतली जातील.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती प्राधिकरणाच्या स्थापनेचा प्रस्ताव तयार करून २५ जानेवारीपर्यंत सादर करेल. त्यानंतर नियोजन विभागाकडून तो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडला जाईल आणि फेब्रुवारीच्या आत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. ज्या पद्धतीने हा परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे त्याच पद्धतीने तो पर्यटन व वन्यजीव याबाबतही प्रसिद्ध आहे. त्यामुळे वनविभागातील जागांचा विकास करून मुबलक पाणीसाठे आणि हरितपट्टे केल्यास वन्यजीवांचा अधिवास वाढण्यासही मदत होणार आहे.
पन्हाळा किल्ल्यावरील ज्या वास्तू नामशेष झाल्या आहेत किंवा होत आहेत त्यांची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. चार दरवाजे, नायकिणीचा सज्जा, ढासळलेले बुरूज पुन्हा उभारताना सध्या सुस्थितीत असलेल्या वास्तू आणि बुरुजांचे केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून संवर्धन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
बैठकीला जनसुराज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, नियोजन विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, प्रधान सचिव विकास खारगे, कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमित माळी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.
१२ ज्योतिर्लिंग आणि ११ मारुती
कोरे म्हणाले, जोतिबा डोंगर परिसरात १२ ज्योर्तिलिंग आणि ११ मारुती आहेत. ८ तीर्थ आहेत. अष्टभैरवाची स्थाने आहेत. या सर्व स्थळांच्या विकासाचा एकत्रित आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्राधिकरणाची स्थापना होईपर्यंत जिल्हा नियोजन मंडळातून नावीन्यपूर्ण योजना म्हणून या परिसराच्या एकात्मिक विकासासाठी देशपातळीवर एजन्सी नेमण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.
जोतिबावर येणाऱ्या भाविकांच्या सर्वांगीण सोयीसाठी, पर्यटकांसाठी या परिसराचा एकात्मिक विकास व्हावा याची सातत्याने मागणी करत होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळेच विकास प्राधिकरणाची स्थापना आणि पन्हाळ्यावरील संवर्धन आणि पुनर्बांधणी असे निर्णय घेण्यात आले. -विनय कोरे, आमदार