जोतिबा यात्रेसाठी पाच मिनिटाला एस.टी.
By Admin | Published: March 25, 2015 11:45 PM2015-03-25T23:45:10+5:302015-03-26T00:07:18+5:30
भाविकांची सोय : कोल्हापूर विभागाचे १६५ गाड्यांचे नियोजन
कोल्हापूर : ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर शहरातून पाच मिनिटाला एस. टी. बसची सोय यात्रेच्या काळात राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाने केली आहे. जोतिबा यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसाठी यंदा १६५ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी शहरातून दि. १ ते ५ एप्रिलपासून दर पाच मिनिटाला बसची सोय केली आहे. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गतवर्षी यात्रेसाठी १५० गाड्यांची सोय करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करून १६५ गाड्यांची सोय करण्यात आली आहे.
गिरोलीहून पुढे मुख्य यात्रेच्या दिवशी दुचाकीला डोंगरावर प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे तिथून पुढे भाविकांना एस. टी. महामंडळ किंवा केएमटीचा आधार घ्यावा लागणार आहे. भाविकांनी वैयक्तिक वाहनांचा वापर टाळून एसटीच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
शहरातील व्यवस्था
मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, टाऊन हॉल, पंचगंगा घाट या चार ठिकाणी भाविकांसाठी दर पाच मिनिटाला बससेवा सुरू करण्यात आली आहे, तसेच १ ते २६ एप्रिलपर्यंत पंचगंगा घाट येथे भाविकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे शेड मारून या ठिकाणाहून जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी महामंडळाने सोय केली आहे.
भाविकांची वाहतुकीच्या दृष्टीने कोणतीही गैरसोय होणार नाही. याची आम्ही काळजी घेणार आहोत. यंदा वाढविलेल्या गाड्यांच्यामार्फत ३ हजार फेऱ्या केल्या जाणार आहेत. यासाठी २४ तास एसटी या मार्गावर धावणार आहेत. तसेच यात्रेसाठी जोतिबा डोंगर व पंचगंगा घाट या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत.
पी. व्ही. पाऊसकर,
विभागीय वाहतूक अधिकारी