Kolhapur: जोतिबाच्या खेट्यांची सांगता; अडीच लाख भाविकांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:21 PM2024-03-26T12:21:43+5:302024-03-26T12:23:36+5:30
जोतिबा : जोतिबा डोंगरावर भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात रविवारी पाचव्या खेट्यासह खेट्यांच्या यात्रेची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे ...
जोतिबा : जोतिबा डोंगरावर भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात रविवारी पाचव्या खेट्यासह खेट्यांच्या यात्रेची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक जोतिबाचे दर्शन घेतले.
कोल्हापूर ते जोतिबा डोंगर अशा पायी प्रवासाने माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून प्रत्येक रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. २५ फेब्रवारीपासून खेटे सुरू झाले होते. पाचव्या खेट्याला सांगता झाली. सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविकांनी श्रीजोतिबाचे गुलाल खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेतले. शेवटच्या खेट्याला जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.
कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविक ही मोठ्या श्रद्धेने खेटे यात्रेत सहभागी होत आहेत. रविवारी शेवटचा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले. चांगभलंच्या गजराने डोंगरघाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला. रविवारी रात्रीपासून मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कोडोलीचे पोलिस निरीक्षक कैलाश कोडग, मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.
रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. जिल्हाधिकारी यांनी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगराला सपत्नीक भेट देऊन जोतिबाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते देवास अभिषेक घालण्यात आला. यावेळी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थानचे सचिव सुशांत बनसोडे उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा पार पडला. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी गावकरी सहभागी झाले होते. दरम्यान, होळी पूजन करून ती प्रज्वलित करण्यात आली. ज्योतिबाचा शेवटचा खेटा, होळी पौर्णिमा, सलग सुट्टी असल्याने अडीच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असल्याचे जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितले.