जोतिबा डोंगरावर सरता रविवार उत्साहात
By admin | Published: June 5, 2017 12:08 AM2017-06-05T00:08:12+5:302017-06-05T00:08:12+5:30
जोतिबा डोंगरावर सरता रविवार उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
जोतिबा : श्री जोतिबा देवाचा सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले. आता जोतिबा देवाचा पालखी सोहळा चार महिने बंद असणार आहे. खंडेनवमीला पालखी सोहळा निघणार आहे.
जोतिबा मंदिरात सरता रविवारनिमित्त देवास पंचामृत व आमरसाचा अभिषेक घालण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी जोतिबा मंदिराभोवती तीन-चार पदरी दर्शन रांगा लावल्या होत्या. सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला. भाविकांनी गुलाल-खोबऱ्यांची उधळण करून धुपारतीचे दर्शन घेतले. दरम्यान, रविवारी कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनीही जोतिबा देवाचे दर्शन करून मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी जोतिबा मंदिरात कायमस्वरूपी स्क्रीन टीव्हीची सोय क रण्याची सूचना केली. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दर्शन घेतले. जोतिबा हक्कदार पुजारी समितीतर्फे त्यांचा श्रीफळ, फेटा बांधून स्वागत करण्यात आले. जोतिबा मंदिरात नियोजित दर्शन मंडप होणार आहे. या ठिकाणी भाविकांना मंदिर प्रवेशासाठी भुयारी मार्ग करण्याची मागणी पुजारी समितीच्यावतीने करण्यात आली. रात्री आठ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह देवाचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला. भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता. नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर-पेढे वाटले.