पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
By समीर देशपांडे | Published: February 11, 2023 07:01 PM2023-02-11T19:01:12+5:302023-02-11T19:08:36+5:30
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता म्हणाले, उत्तरही देण्याची गरज नाही
कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातील कणेरी येथील सिध्दगिरी मठावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.
शिंदे म्हणाले, ही घटना घडली त्याच दिवशी मी जिल्हा पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. पत्रकार आपला जीव धोक्यात घालून चुकीचं होत असेल ते किंवा जे चांगले होते ते जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळेच त्यांच्यावरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कोणीही पाठीशी घालता कामा नये. कठोरात कठोर शिक्षा केली जावी याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. याबाबत योग्य सुचना दिल्या आहेत.
याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकारणात जायचे नाही. याचे उत्तरही देण्याची गरज नाही. परंतू कोणाशीही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं, असं शरद पवार म्हणाले. तसेच पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.