पत्रकारांनी आव्हानांना सामोरे जावे
By admin | Published: January 7, 2017 01:11 AM2017-01-07T01:11:26+5:302017-01-07T01:11:26+5:30
संपादक परिषदेमधील सूर : शिवाजी विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागाचा कार्यक्रम
कोल्हापूर : पत्रकारितेतील संधी साधण्यासह आव्हाने पेलण्यासाठी सखोल अभ्यास आणि पक्की वैचारिक बैठक आवश्यक आहे. सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाचा विस्तार वेगाने होत असून, त्यानुसार सामाजिक बदल होत आहे. हे बदल माध्यमांनी अंगीकारणे आवश्यक आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठातील संपादक परिषदेमध्ये शुक्रवारी व्यक्त झाला.
विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभाग, मास कम्युनिकेशन आणि विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळित, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, ‘बी न्यूज’चे संपादक चारुदत्त जोशी यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित होते. त्यात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, आजची नवी पिढी सजग आणि जगाशी संबंधित असल्याने त्यादृष्टीने माध्यमांनी विषय स्वीकारून आशयसमृद्ध मांडणी केली पाहिजे. प्रत्येक माहितीत नवीन विचार, नवा आशय असायला हवा. पारंपरिक माध्यमांसमोर नवमाध्यमांचे मोठे आव्हान असले, तरी माध्यमांचा हा विस्तार सकारात्मक आहे. हा विस्तार आणखी गतीने होणार असून, त्यात अनेक संधी आणि आव्हाने दडलेली आहेत. या संधी साधण्यासह ती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारितेमध्ये येणाऱ्या युवा पिढीने सखोल अभ्यास, वैचारिक बैठक पक्की करावी. माहिती उपसंचालक सतीश लळित म्हणाले, सध्या देशाला विकास पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर म्हणाले, बदलत्या काळानुसार पत्रकारिता, माहितीचे स्रोत, तंत्रज्ञान बदलले, तरी ज्ञानसंपादनाची गरज कायम राहणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, डॉ. राजेंद्र पारिजात, सुमेधा साळुंखे, श्रीहरी देशपांडे, रावसाहेब पुजारी, चंद्रशेखर वानखेडे, आदी उपस्थित होते. वृत्तपत्र विद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. शीतल काळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
सकारात्मक पत्रकारिता
कोल्हापूरची पत्रकारिता सकारात्मक आहे. येथील पत्रकार हे विचारमंच आहे. त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण असून, ते सोडविण्याची तळमळ असल्याचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, नकारात्मक पत्रकारिता ही अल्पायुषी असते. एक विचार घेऊन पत्रकारिता होणे आवश्यक आहे. पत्रकारितेमधील सकारात्मकता आयुष्यभर
जपावी.
शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी पत्रकार दिनानिमित्त संपादक परिषद हा कार्यक्रम झाला. यावेळी डावीकडून चारुदत्त जोशी, जयसिंग पाटील, श्रीराम पवार, वसंत भोसले, दशरथ पारेकर, प्रा. डॉ. निशा पवार, वर्षा पाटोळे, आलोक जत्राटकर उपस्थित होते.