पंचगंगेसह जयंती नदीला महापुर, १०१ ने वाचविले ३०० हून अधिकजणांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:45 PM2019-08-05T12:45:58+5:302019-08-05T12:51:41+5:30
अतिवृष्टीमुळे महापुराने वेढलेल्या शहरातील कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, सुतार मळा, सिध्दार्थनगर, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत येथील ३०० हून अधिक लोकांचे प्राण महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी वाचविले. १०१ ला कॉल येताच स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मदत करीत आहेत.
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे महापुराने वेढलेल्या शहरातील कुंभार गल्ली, लक्ष्मीपूरी, सुतार मळा, सिध्दार्थनगर, बापट कॅम्प, लक्षतीर्थ वसाहत येथील ३०० हून अधिक लोकांचे प्राण महापालिकेच्या अग्निशामक जवानांनी वाचविले. १०१ ला कॉल येताच स्वत:चा जीव धोक्यात घालून ते मदत करीत आहेत.
सततच्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेसह जयंती नदीला महापुर आला आहे. गेल्या चार दिवसापासून महापालिका अग्निशामक दलाचा १०१ फोन नंबर खनाणत आहे. झाडपडझडी, प्राणी अडकले, रोडवर झाड पडले, पुराच्या पाण्यात लोक अडकलेत अशा दिवसाला ६० पेक्षा जास्त वर्दी येत आहेत. चार पथकांद्वारे जवाण मदतीची मोहिम राबवित आहेत.
लक्ष्मीतीर्थ वसाहत घाडगे मळा, रमणमळा माळी मळा, बापट कॅम्प, शाहुपूरी कुंभार गल्ली, सुतार मळा, लक्ष्मीपूरी कोंडाओळ, सिध्दार्थनगर परिसरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक लोक जिव मुठीत घेवून घरात बसले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी स्वत:ची जिव धोक्यात घालून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षीतस्थळी हलवून त्यांचे प्राण वाचविले.
नागरिकांना याठिकाणी हलविले....."
- शाहुपूरी कुंभार गल्ली : अंबाबाई मंदिर परिसरातील धर्मशाळा
- सुतार मळा, लक्ष्मीपूरी : चित्रदूर्ग मठ, मुस्लिम बोर्डिंग
- सिध्दार्थनगर : सिध्दार्थनगर समाज मंदिर
- बापट कॅम्प : प्रिन्स महाविद्यालय, जाधववाडी
- रमणमळा : शासकीय धान्य गोदाम