न्यायाधीश, कर्मचाऱ्यांना कामकाजास अटकाव करणार
By admin | Published: January 30, 2015 11:53 PM2015-01-30T23:53:19+5:302015-01-31T00:02:29+5:30
वकिलांच्या बैठकीत निर्णय : सर्किट बेंचसाठी आज आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी उद्या, शनिवारी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना ज्या-त्या जिल्ह्यात न्यायालयीन कामकाजापासून अटकाव करण्याचा निर्णय आज, शुक्रवारी जिल्हा वकील बार असोसिएशनच्या बैठकीत वकिलांनी घेतला. टाऊन हॉल येथील बार असोसिएशनच्या सभागृहात दुपारी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. विवेक घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांची ६ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून आपली बाजू मांडण्याचा निर्णय यावेळी घेतला.
सर्किट बेंच व्हावे यासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या दालनात काल, गुरुवारी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर उद्या, शनिवारी न्यायाधीश व कर्मचाऱ्यांना सहा जिल्ह्यांतील ज्या त्या क्षेत्रातील न्यायालयीन कामकाजापासून वकील बांधव अटकाव करणार आहेत. त्यासाठी टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सकाळी साडेनऊ वाजता वकील बांधवांनी तसेच पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत बार असोसिएशनने केले. या बैठकीस उपाध्यक्ष अॅड. बाळासाहेब पाटील, सेक्रेटरी अॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह वकील उपस्थित होते.
दरम्यान, मुंबईत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे फेबु्रवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी येणार आहेत. त्यावेळी मुखर्जी यांना भेटून कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, अशी मागणी करूया, असे वकिलांनी यावेळी ठरविले.