न्यायाधीश कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत : नलवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:41 PM2020-02-08T16:41:56+5:302020-02-08T16:44:18+5:30
न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले.
अॅडव्होकेटस् अॅकॅडमीच्यावतीने वकिलांसाठी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकील प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी होत्या.
यावेळी नलवडे यांनी न्यायालयाला घटनेचे कलम २२६ प्रमाणे प्राप्त असलेले अधिकार आणि त्यांचे महत्व तसेच लवाद शासकीय विभाग, पोलिस यंत्रणा व सरकार यांच्याविरोधात दाद मागण्याचा मार्ग उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.
गोवा सरकारचे अॅडव्होकेट जनरल अॅड. देवीदास पांगम, वृषाली जोशी यांनी उच्च न्यायालयात वकील करतानाचे आपले अनुभवही यावेळी कथन केले. अॅडव्होेकेटस् अॅकॅडमीचे अध्यक्ष अॅड. सिध्दार्थ पाटकर यांनी प्रास्ताविक केले. अॅड. संतोष शहा यांनी मनोगत व्यक्त केले तर अॅड. अमीर शेख यांनी आभार मानले.
या शिबीरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अॅड. अनिल साखरे, सिनिअर कौन्सिलर अॅड. अशोक मुंडरगी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. अभय नेवगी, अॅड. युवराज नरवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र, गोवाचे सदस्य अॅड. पारिजात पांडे, अॅड. संग्राम देसाई ,कोल्हापूरचे जिल्हा सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल, सिंधुदुर्गचे जिल्हा सरकारी वकील अॅड. संदेश तायशेटे यांच्यासह वकील आणि कायद्याचे अभ्यासक विद्यार्थी उपस्थित होते.
कोल्हापूर येथे शनिवारी आयोजित उच्च न्यायालयातील वकीलबाबतच्या मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन न्यायाधीश अॅड. टी.व्ही. नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून न्यायाधीश वृषाली जोशी, अॅड. देवीदास पांगम, अॅड. सिध्दार्थ लाटकर, अॅड. संतोष शहा, अॅड. अनिल साखरे, अॅड. अशोक मुंडरगी, अॅड. अभय नेवगी, अॅड. युवराज नरवणकर उपस्थित होते.