न्यायासाठी दादांच्या दारी! : लातूरचे अभिजित सोळंकेंचे दादांच्या कार्यालयासमोर उपोषण --मजूर संस्थांची बिले रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:05 PM2018-01-01T23:05:22+5:302018-01-01T23:05:28+5:30
कोल्हापूर : औसा तालुक्यातील (जि. लातूर) तीन वर्षांतील मजूर संस्थांची बिले रखडल्याच्या कारणावरून लातूरचे
कोल्हापूर : औसा तालुक्यातील (जि. लातूर) तीन वर्षांतील मजूर संस्थांची बिले रखडल्याच्या कारणावरून लातूरचे अभिजित सोळंके यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापुरातील ताराराणी चौकातील शासकीय विश्रामगृहामधील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या आवारात सोमवारी आमरण उपोषण केले. याची तातडीने दखल घेत मंत्री पाटील यांनी या मजूर संस्थांची थकीत बिले त्वरित द्यावी, असे फोनवरून उस्मानाबाद सर्कल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी यांना सांगितले, अशी माहिती सोळंके यांनी यावेळी दिली.
सोळंके यांचे निवेदन असे की, लातूर येथील विश्वास मजूर सहकारी संस्था व उमरगा येथील येल्लादेवी मजूर सहकारी संस्था यांनी २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये ४१ लाखांची कामे केली आहेत. त्यापोटी शासनाचे ३७ लाख रुपये येणे बाकी आहे. औसा तालुक्यातील तीन वर्षांखालील ३०५४ गट-अ अंतर्गत ही कामे केली आहेत.
ही रक्कम मिळण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला सोळंके बसले. यावेळी उस्मानाबाद येथील अधीक्षक अभियंता यांनी दूरध्वनीवरून उर्वरित बिले एक महिन्याच्या आत अदा केली जातील, असे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण सोडले. त्यानंतर औसा विभागाकडील बिले निलंगा विभागाकडे वर्ग झाल्यामुळे कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता उस्मानाबाद यांना संपर्क केला.
मात्र, त्यांनी मला पैसे दिले नाहीत. ही बिले डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत मिळाली नाही. त्यामुळे मी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी सोळंके यांना सायंकाळी ताब्यात घेतले.