न्यायाधीशांना प्रवेशद्वारात रोखले

By admin | Published: February 1, 2015 01:28 AM2015-02-01T01:28:06+5:302015-02-01T01:29:17+5:30

वकिलांचे आक्रमक आंदोलन : सर्किट बेंचसाठी लढा तीव्र करणार

The judges were stopped at the entrance | न्यायाधीशांना प्रवेशद्वारात रोखले

न्यायाधीशांना प्रवेशद्वारात रोखले

Next

 कोल्हापूर : शहरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी आज, शनिवारी वकील बांधवांनी टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. जे. जमादार यांच्यासह अन्य न्यायाधीशांना रोखले.
न्यायाधीश जमादार यांनी हात जोडून आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली; पण मागणीवर ठाम राहत त्यांच्या वाहनांसमोरच ठिय्या आंदोलन करणाऱ्या वकिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायाधीशांसह न्यायालयीन कर्मचारी प्रवेशद्वारातून आत गेले. दिवसभराचे न्यायालयीन कामकाज सुरळीत झाले. सर्किट बेंचसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार वकिलांनी जाहीर केला.
गेल्या तीस वर्षांपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व त्याअगोदर सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी राज्य शासनाकडून सर्किट बेंचचा ठराव आणा, असे वकिलांच्या शिष्टमंडळाला मुंबईत सांगितले. त्यानंतर सहा जिल्ह्यांतील वकिलांनी या मागणीसाठी आंदोलन पुकारले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व न्यायाधीश व कर्मचाऱ्यांना प्रवेशद्वाराजवळ अटकाव करण्यात आला.
सकाळी साडेआठपासून वकील बांधव याठिकाणी जमू लागले. पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलक वकिलांनी ‘वुई वॉँट सर्किट बेंच’, ‘खंडपीठ झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.
सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. जे. जमादार यांची गाडी सीपीआर चौकाकडून प्रवेशद्वाराजवळ आली. त्यावेळी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, आदींनी गाडी अडविली.
त्यावेळी गाडीमधून उतरून न्यायाधीश जमादार बाहेर आले. यावेळी वकिलांनी ‘आमचा तुम्हाला विरोध नाही. गेल्या ३० वर्षांपासून या मागणीसाठी झटत आहोत. त्यामुळे आपण न्यायालयीन कामकाजासाठी जाऊ नये,’ अशी विनंती केली. यानंतर अ‍ॅड. विवेक घाटगे व अन्य वकिलांनी जमादार यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली.
त्यावेळी जमादार यांनी हात जोडून वकील बांधवांनी हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली. पण, सर्किट बेंच होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार या मतावर ठाम आहोत, असे सांगून वकिलांनी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीजवळ ठिय्या मारला.
सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
आंदोलनात शिवाजीराव चव्हाण, महादेवराव आडगुळे, माणिक मुळीक, अजित मोहिते, गिरीश नाईक, प्रतिमा पाटील , सविता परब, मीना पोवार, पूजा कटके,सुलभा चिपडे, मंजिरी येजरे, रत्नमाला कब्बूर, विद्या इंगवले, सुशीला कदम, नीलांबरी गिरी, विद्या कांबळे, प्रमोदिनी शिंदे, सपना भोसले, तरन्नूम मुजावर, धनश्री चव्हाण, चारूलता चव्हाण, सारिका तोडकर, अश्विनी लगारे, पूर्णिमा कुलकर्णी, दीपलक्ष्मी पेडणेकर, आदींचा सहभाग होता.
टोलविरोधी कृती समितीचा पाठिंबा
टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्किट बेंचच्या मागणीला पाठिंबा दर्शवीत आंदोलनात सहभाग घेतला. यामध्ये बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, दीपा पाटील, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अशोक रामचंदानी, आदी तसेच पक्षकार संघटनेचे सुरेश गायकवाड यांसह पक्षकारांचा सहभाग होता.
बारा तालुक्यांतील वकिलांचा सहभाग
जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधून वकील बांधव आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आले होते. वकिलांची लक्षणीय संख्या पाहता पोलीस प्रशासनाने शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी लावले होते. वकिलांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना तीन पोलीस व्हॅन लागल्या.(प्रतिनिधी)

Web Title: The judges were stopped at the entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.