न्यायव्यवस्था लोकाभिमुख करण्यास चालना
By admin | Published: October 4, 2016 12:26 AM2016-10-04T00:26:57+5:302016-10-04T00:58:11+5:30
देवानंद शिंदे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
कोल्हापूर : फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे समाजातील तंटे सामंजस्याने सुटण्यास मदत होणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी येथे केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच वृक्ष पूजन करून फिरते विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, फिरत्या लोक न्यायालयासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून न्यायव्यवस्था लोकाभिमुख होत आहे, हे अत्यंत स्तुत्य म्हणावे लागेल. भारतीय न्यायव्यवस्था ही बुद्धी व विवेक यांचा जाणीवपूर्वक वापर करणारी जगातील एकमेव न्यायव्यवस्था आहे.
डॉ. अमित सैनी म्हणाले, जनतेला न्यायासाठी न्यायालयापर्यंत जावे लागते. यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्या अनुषंगाने समाजामध्ये तंटे उद्भवू नयेत, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता महात्मा गांधी तंटामुक्तीसारखी मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर फिरते विधी सेवा तथा लोकअदालतसारखा उपक्रम जिल्ह्यात सुरू होत आहे, हे स्तुत्य म्हणावे लागेल.
प्रदीप देशपांडे म्हणाले, फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालतमुळे या चक्रव्यूहापासून सामान्य व्यक्ती दूर राहण्यास मदत होणार आहे. समाजातील बहुतांश तंटे सामंजस्य व तडजोडीतून सुटण्यास मदत झाली तर कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलिस खात्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी, लोकअदालत ही संकल्पना समाजामध्ये हळूहळू रुजत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंदे्र, संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर, उपवन संरक्षक प्रभुनाथ शुक्ला, आदी उपस्थित होते. यावेळी उमेशचंद्र मोरे यांनी प्रास्ताविक, तर श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच. एस. व्हनमोरे यांनी स्वागत केले. प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पक्षकार, विद्यार्थी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रा. डॉ. पांडुरंग पाटील यांनी आभार मानले.
कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सोमवारी श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘फिरत्या विधी सेवा तथा लोकअदालत मोबाईल व्हॅन’चे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी, निवृत्त जिल्हा न्यायाधीश जी. एम. टंकसाळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. उमेशचंद्र मोरे, आदी उपस्थित होते.