आरक्षण दिले तर गूळ; नाही तर ‘कोल्हापुरी’; कोल्हापूरच्या दसरा चौकात भगवे वादळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:35 AM2018-08-06T00:35:37+5:302018-08-06T00:35:43+5:30
कोल्हापूर : रविवार सुटीचा दिवस साधून कोल्हापूर शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातून अनेक रॅली ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा गजर करत दसरा चौकात एकत्र आल्याने चौकातील वातावरण भगवेमय झाले होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवी कपडे व भगव्या साड्या नेसून महिलाही मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी ऐतिहासिक दसरा चौक दणाणला होता. विशेषत: जुना बुधवार पेठ आणि संयुक्त उपनगरच्या रॅलीने लक्ष वेधले. जुना बुधवारच्या कार्यकर्त्यांनी रॅलीतून आणलेले कोल्हापुरी चप्पल व गुळाच ढेप आकर्षणाचे केंद्र ठरली.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौकात गेले बारा दिवस सकल मराठा ठोक मोर्चाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरू आहे.
संयुक्त उपनगराचे शक्तिप्रदर्शन
सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर मंचच्यावतीने रविवारी सकाळी क्रशर चौक आणि देवकर पाणंद या दोन ठिकाणांहून दुचाकी रॅली काढण्यात आली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून दसरा चौकात आली. त्यानंतर घोषणा देत सर्व कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आले. या रॅलीने शक्तिप्रदर्शन घडविले. रॅलीत भगवे झेंडे, भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. या रॅलीमध्ये नगरसेवक शारंगधर देशमुख, मनीषा कुंभार, दीपा मगदूम, रिना कांबळे, आदींचाही सहभाग होता.
खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी बंद
करवीर तालुक्यातील खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी या गावांत ग्रामस्थांनी रविवारी मराठा आरक्षण मागणीसाठी सर्व व्यवहार बंद ठेवले. त्यानंतर या गावातून रॅली काढून घोषणा देत दसरा चौकात ठिय्या आंदोलनस्थळी येऊन सहभाग घेतला. यामध्ये खुपिरे सरपंच तानाजी पाटील, साबळेवाडी सरपंच सरदार पाटील, शिंदेवाडी सरपंच रेवती वडगावकर यांच्यासह कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक संजय बळवंत पाटील, शिवाजी गुरव, सर्जेराव पाटील, माजी सरपंच संजय पाटील, आदी सहभागी होते.
यांनीही घेतला सहभाग
शिवाजी विद्यापीठ सेवक संघ, जुना बुधवार संयुक्त मंडळ, संयुक्त उपनगर मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, साळोखे फौंडेशन, कदमवाडी परिसर मंच, ब्राह्मण युवा मंच, कसबा सांगाव ग्रामस्थ (ता. कागल), कोतोली ग्रामस्थ यांनीही दसरा चौकात येऊन आंदोलनात सहभाग घेतला.
आज मंगळवार पेठ एकवटणार
सकल मराठा ठोक आंदोलनप्रश्नी मंगळवार पेठेतील सर्व नागरिक, तालीम मंडळांचे कार्यकर्ते व व्यापारी आज, सोमवारी मिरजकर तिकटी येथे सकाळी ११ वाजता आंदोलन करणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे सर्व व्यवहार या दोन तासांत बंद राहणार आहेत.
इच्छा असेल तर प्रश्न सुटेल : चव्हाण
कोल्हापूर : सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात आणि रास्ता रोको आंदोलनात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी रविवारी सहभाग घेतला. त्याप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. रविवारी कोल्हापुरात आत्महत्या केलेल्या विनायक गदगे कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे सांगून श्रद्धांजली वाहिली. मराठा समाजाने आत्महत्या करू नये. तसेच आंदोलन हे सनदशीर मार्गाने, संयमाने व कोणतेही गालबोट न लावता हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले.
संयुक्त जुना बुधवार पेठेची भव्य रॅली
कोल्हापूर : ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत आणि भगवे ध्वज घेऊन संयुक्त जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी रविवारी भव्य दुचाकी रॅली काढली. यावेळी दसरा चौकात सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठोक आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर कोल्हापुरी चप्पल राज्यसरकारच्या डोक्यावर मारले जाईल आणि आरक्षण दिले तर कोल्हापुरी गुळाने त्यांचे तोंड गोड करू, अशा कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.यावेळी माजी नगरसेवक धनंजय सावंत, दिगंबर फराकटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेविका सरिता मोरे, नगरसेवक अफझल पिरजादे उपस्थित होते. रॅलीत सुशील भांदिगरे, नागेश घोरपडे, उदय भोसले, हेमंत साळोखे, मकरंद स्वामी, सचिन क्षीरसागर, संदीप राणे, अमोल डांगे, प्रवीण डांगे, अभिजित बुकशेट, मधुकर पाटील, नितीन मिठारी, अक्षय हांडे, रणजित भोसले, गणेश पाटील, राहुल घाटगे, कुणाल भोसले, विनायक जाधव, संजय घाटगे, भोला पाटील, आदींचा सहभाग होता.