Bribe Case: दहा हजाराची लाच स्वीकारताना कोल्हापूर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 08:00 PM2022-07-21T20:00:48+5:302022-07-21T20:03:02+5:30
नवीन नळ कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी
कोल्हापूर : दोन नवीन नळ कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. राजेंद्र बळवंत हुजरे (वय ४५, रा. प्लाॅट नं.३, आर.के.नगर, सदाशिव दिंडे काॅलनी कोल्हापूर) असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपतच्या या कारवाईनंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली.
तक्रारदार हा महापालिकेचा मान्यता प्राप्त प्लंबर आहे. त्याने त्याचे ग्राहक असलेल्या दोघाचे नवीन नळ कनेक्शनकरीता महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज केला. तक्रारदाराकडे नवीन दोन नळ कनेक्शन प्रकरण मंजूर करण्याकरीता संशयित हुजरे याने दहा हजार रुपयांची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनूसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून हुजरे यास रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे व अपर पोलिस उपायुक्त सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, अंमलदार शरद पोरे, रुपेश माने, संदीप पडवळ यांनी केली.