कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:16 PM2019-04-17T18:16:35+5:302019-04-17T18:23:01+5:30
राष्ट्रीय स्तरावरील आयलीग, इंडियन वुमेन्स लीग व नेदरलँड-भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय अशा यशस्वी संयोजनानंतर अखिल भारतीय फुुटबॉल महासंघ (नवी दिल्ली) वतीने कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियम येथे हिरो कनिष्ठ गट
कोल्हापूर : राष्ट्रीय स्तरावरील आयलीग, इंडियन वुमेन्स लीग व नेदरलँड-भारत यांच्यातील आंतरराष्ट्रीय अशा यशस्वी संयोजनानंतर अखिल भारतीय फुुटबॉल महासंघ (नवी दिल्ली) वतीने कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनतर्फे छत्रपती शाहू स्टेडियम येथे हिरो कनिष्ठ गट मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत २७ राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत, अशी माहिती फुटबॉल महासंघाच्या स्पर्धा समिती प्रमुख सपना राणी यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
शाहू स्टेडियम व पोलो मैदानावर २० एप्रिल ते १ मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत आठ गटांंतर्गत प्राथमिक साखळी फेरीचे ३३ सामने, तर उपांत्यपूर्व फेरीचे चार आणि उपांत्य फेरीचे दोन व अंतिम फेरीचा एक असे एकूण ४0 सामने होणार आहेत. रोज सकाळच्या सत्रात चार, तर दुपारच्या सत्रात दोन असे सहा सामने होणार आहेत. स्पर्धेसाठी के. एस. ए. पेट्रन चिफ शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समिती, तर के. एस. ए. अध्यक्ष मालोजीराजे व एआयएफएफच्या महिला समितीच्या सदस्या मधुरिमाराजे यांच्या मार्गदर्शनाखाली एलओसी समिती नेमण्यात आली आहे. स्पर्धेसाठी फिफाचे निरीक्षक स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर मॅच कमिशनर म्हणून गोकुलदास नागवेकर (गोवा), थंबीराज गोपाल (तामिळनाडू), दीपक शर्मा (हिमाचल प्रदेश); तर रेफ्री असेसर म्हणून अनामिका सेन (कोलकत्ता), सुरजा मुखर्जी (छत्तीसगड), रमेश बाबू (तामिळनाडू) हे काम पाहणार आहेत. स्पर्धेसाठी भारतातील २५ राष्ट्रीय महिला पंच म्हणून काम पाहणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. २0) दुपारी ३.३० वाजता होणार असून, पहिला सामना झारखंड विरुद्ध जम्मू काश्मीर यांच्यात होणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी मोफत पाहायला मिळणार आहे. महिला वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मुलींच्या फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन मधुरिमाराजे व मालोजीराजे यांनी केले आहे.
यावेळी के. एस. ए. सरचिटणीस माणिक मंडलिक, सहसचिव राजेंद्र दळवी, फुटबॉल सचिव प्रा. अमर सासने, विश्वास मालेकर, नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे-पाटील, दीपक राऊत, रोहन स्वामी, दिग्विजय मळगे, आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रचा समावेश ‘जी ’ गटात
‘ए’ गटात झारखंड, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, ‘बी’ गटात तामिळनाडू, दिल्ली, मध्यप्रदेश, ‘सी’ गटात मणिपूर, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, ‘डी’ गटात वेस्ट बंगाल, हरियाणा, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, ‘ई’ गटात ओडिसा, पाँडेचरी, छत्तीसगड, ‘एफ’ गटात बिहार, गुजरात, तेलंगणा, ‘जी’ गटात हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, चंदीगड, ‘एच’ गटात मिझोराम, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब या संघांचा समावेश आहे.
कोल्हापूरचा फुटबॉल देशभरात प्रसिद्ध आहे. त्यात येथे नेदरलँड व भारत यांच्यातील महिलांचा आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना, राष्ट्रीय स्तरावरील आयलीग, ओएनजीसी सेकेंड डिव्हीजन आयलीग, इंडियन वुमेन्स लीग अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या यशस्वी नियोजन कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने केले होते. याची दखल घेत भारतीय फुटबॉल महासंघाने कोल्हापूरला पुन्हा राष्ट्रीय स्पर्धा घेण्यास प्राधान्य दिले आहे.
- सपना राणी, स्पर्धा प्रमुख, एआयएफएफ