जिद्द आणि मेहनतीला संयमाची जोड हेच यशाचे गमक

By admin | Published: June 16, 2015 01:11 AM2015-06-16T01:11:22+5:302015-06-16T01:14:57+5:30

‘मीट द टॉपर’ चर्चासत्रातील सूर : प्रामाणिक प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत यश अवघड नाही

Junk and hard work combined with patience | जिद्द आणि मेहनतीला संयमाची जोड हेच यशाचे गमक

जिद्द आणि मेहनतीला संयमाची जोड हेच यशाचे गमक

Next

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जिद्द, मेहनत आणि चिकाटीबरोबरच संयमाची तितकीच आवश्यकता आहे़ पूर्व आणि मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या चार टप्प्यांमधून जाताना उमेदवारांच्या संयमाची अग्निपरीक्षाच असते; पण प्रामाणिक प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे फार अवघड नाही, असा कानमंत्र पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांनी दिला़
‘लोकमत’तर्फे राजारामपुरी येथील डॉ़ व्ही़ टी़ पाटील स्मृतिभवनात शनिवार (दि़ १३)पासून सुरू असलेल्या ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फे अर’चा समारोप सोमवारी झाला़ समारोपादिवशी दुपारी ‘मीट द टॉपर’ या सत्राचे आयोजन केले होते़ यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख आणि इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर यांच्या हस्ते उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांचा सत्कार करण्यात आला़ प्रमुख पाहुणे म्हणून स्टडी सर्कलचे केंद्र समन्वयक राहुल पाटील उपस्थित होते़ उज्ज्वला भिंगुडे म्हणाल्या, बी़ ई़ केल्यानंतर ‘पीएसआय’ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले़ पहिल्यापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण असल्याने या परीक्षेकडे वळले़ दररोज सहा तास नियोजनबद्ध अभ्यास केला. परीक्षा कोणत्याही असो, पालकांचे मनोधैर्य हे
खूप महत्त्वाचे असते़; पण करिअरबाबतचा निर्णय हा आपण स्वत:च घ्यावा़ ‘लोकमत’ने अगदी योग्य वेळी शैक्षणिक प्रदर्शन घेतले असून, त्याचा फ ायदा विद्यार्थ्यांना होईल़
प्रियांका पाटील म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना संयमाची खूप गरज आहे़ किती तास अभ्यास केला, यापेक्षा घेतलेला एखादा टॉपिक व्यवस्थितपणे पूर्ण वाचून त्याचे योग्य आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे़ सातवी ते दहावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांच्या वाचनाबरोबरच इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, आदी पुस्तकांचे सखोल वाचन हवे़ वाचनादरम्यान आवडते विषय सुरुवातीला घ्यावे़ मुलाखतीदरम्यान येत नसलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे न देता, प्रांजळपणे उत्तरे येत नसल्याचे सांगून गोंधळ टाळावा.
राहुल पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षा हा करिअरचा चांगला आणि आश्वासक मार्ग आहे़ स्पर्धा परीक्षेत उतरू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग ध्येये बाळगली पाहिजेत़ ‘एमपीएससी’ शिवाय ‘यूपीएससी’कडेही वळले पाहिजे़ यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षा सोप्या जातात़ या क्षेत्राकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता, समाजसेवेचा एक उत्कृष्ट मार्ग म्हणून पाहिल्यास उज्ज्वल भविष्याची संधी मिळेल़ प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)


यावेळी उज्ज्वला भिंगुडे आणि प्रियांका पाटील यांच्या हस्ते ‘लोकमत’तर्फे घेण्यात आलेल्या कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल्स भाग - २ स्पर्धेतील प्रथम क्रमाकांचा विजेता योगेश माळी याचा सत्कार करण्यात आला़ सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख ५००१ असे या सत्काराचे स्वरूप होते़

Web Title: Junk and hard work combined with patience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.