‘एसटीपी’साठी जयंतीचा उपसा बंद
By admin | Published: February 13, 2015 12:36 AM2015-02-13T00:36:19+5:302015-02-13T00:45:19+5:30
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची बैठक महिनाभर दूषित पाणी पंचगंगेत मिसळणार,, प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाय
कोल्हापूर : कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) शुद्ध झालेले पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जयंती नाल्यातील दूषित पाण्याचा उपसा रविवार (दि. १५) पासून तीन आठवडे बंद करण्याचा निर्णय गुरुवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाला थेट नदी सोडला जाणार असला तरी दूषित पाण्याची तीव्रता व व्याप्ती कमी करण्यात येणार आहे. तसेच नदी प्रवाहित करण्यासाठी राधानगरी धरणातून दररोज १०० ते १२५ क्युसेक जादा पाणी सोडण्यात येणार आहे. एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू करून पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी मार्गातील प्रमुख अडथळा दूर करण्याचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याने सर्व घटकांनी यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
‘एसटीपी’तून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी नदीपर्यंत वाहून नेण्यासाठी दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. शेतातून जाणाऱ्या या पाईपलाईनच्या कामात वाहणाऱ्या पाण्यामुळे अडथळा येत आहे. उर्वरित ७५० मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी जुना व नवा असे दोन्ही एसटीपी प्रकल्प पूर्णपणे बंद करावे लागणार आहेत. याबाबत तोडगा काढण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपायुक्त विजय खोराटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी मनीष होळकर, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड व दिलीप देसाई, पाटबंधारे विभाग, महापालिकेचा जल व ड्रेनेज विभागाचे अधिकारी उपस्थित होते.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ मार्चपर्यंत महापालिकेला कोणत्याही स्थितीत बावडा एसटीपी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा लागणार आहे. जयंती नाला नदीत सोडल्याशिवाय पाईपलाईनचे काम पूर्ण होऊ शकत नाही. सर्व घटकांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी थोडी कळ सोसून मदत करण्याचे आवाहन आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. यास एमपीसीबी, पाटबंधारे विभागासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. येत्या तीन आठवड्यांत पाईपलाईनचे तीन टप्प्यांत रात्रंदिवस काम करून पूर्ण करण्यात येणार आहे. यानंतर एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे ठरले.