ज्वारीच्या दरात दोन रुपयांची घसरण
By admin | Published: January 5, 2015 12:17 AM2015-01-05T00:17:35+5:302015-01-05T00:43:44+5:30
मेथीची मोठी आवक : सांगोल्याच्या ‘तैवान’ वाणाच्या पपईची ग्राहकांना भुरळ
कोल्हापूर : विविध आजारांवर गुणकारी असणाऱ्या पपईची आवक वाढली आहे. सांगोला येथील ‘तैवान’ वाणाच्या चवीला गोड असणाऱ्या पपईने ग्राहकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. कडधान्य मार्केट स्थिर असले तरी ज्वारीच्या दरात थोडी घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर आवाक्यात असले तरी मेथीने बाजार अक्षरश: फुलून गेला आहे.
मराठवाड्यात अवकाळी पाऊस चांगला झाल्याने ज्वारीचे पिके जोमात आहे. त्याचा थेट परिणाम ज्वारी मार्केटवर झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ‘नंबर वन’ ज्वारीच्या दरात किलोमागे दोन रुपयांची घसरण झाली आहे. जिरेच्या दरात किलोमागे चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. मध्यंतरी एकदमच कडाडलेला शाबूदाणा आता थोडा आवाक्यात आला आहे. तेलावर ५ टक्के कर आकारल्याने सरकी तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली होती, ती कायम आहे. साखरेच्या दराने गेले महिनाभर आपली जागा सोडलेली नाही. हरभरा डाळ, तूरडाळ, मुगडाळीचे दर तुलनात्मक स्थिर आहेत. खोबऱ्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे.
स्थानिकच्या भाजीपाल्याची आवक सुरू झाल्याने भाजी मार्केट स्थिर दिसत आहे. गवार वगळता सर्वच भाज्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत. घाऊक बाजारात गवारचे दरात किलोमागे वीस रुपयांची वाढ झाली आहे. गाजर, हरभरा पेंडी व कांदा पातची आवक वाढली असून, त्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. कोल्हापूर बाजार समितीत रोज मेथीची ५० हजार पेंडीची आवक होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दहा रुपयाला तीन पेंड्या विकाव्या लागत आहेत.
थंडी व ढगाळ वातावरणामुळे फळ मार्केटमध्ये कमालीची शांतता दिसत आहे. फळांचा उठाव होत नसल्याने दर स्थिर आहेत. सफरचंद, संत्री, अननस, बोरे, स्ट्रॉबेरीची आवक चांगली आहे. सांगोला, पंढरपूरमधून पपईची आवक सुरू आहे. पिवळी धमक पपई ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून २० रुपयांपासून ६० रुपयांपर्यंत पपईचे दर आहेत. (प्रतिनिधी)
जिरे ४० रुपयांनी महागले
जिरेच्या दरात किलोमागे चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. मध्यंतरी एकदमच कडाडलेला शाबूदाणा आता थोडा आवाक्यात आला आहे. तेलावर ५ टक्के कर आकारल्याने सरकी तेलाच्या दरात गेल्या आठवड्यात वाढ झाली होती, ती कायम आहे.
गूळ तेजीत
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात थोडी वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सरासरी दरात शंभर रुपयांची वाढ झाली असून, प्रतिक्विंटल ३३०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.
कांदा-बटाटा स्थिर!
बाजार समितीत रोज ५८७४ पोती कांद्याची आवक होते. कांद्याचे दर सरासरी १३ रुपये, तर बटाट्याचे दर १८ रुपयांवर स्थिर आहे.
सांगोला व पंढरपूर येथून ‘तैवान’ व ‘सिडलेस’ असे दोनप्रकारच्या पपईची आवक सुरू आहे. ही पपई गोड व आरोग्यास चांगली असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.
- एस. के. बागवान, फळ विक्रेते