‘राधानगरी’त २० दिवसांचाच पाणीसाठा

By admin | Published: May 26, 2016 12:13 AM2016-05-26T00:13:00+5:302016-05-26T00:23:27+5:30

टंचाईचे सावट : कोल्हापूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार

Just 20 days of water storage in Radhanagari | ‘राधानगरी’त २० दिवसांचाच पाणीसाठा

‘राधानगरी’त २० दिवसांचाच पाणीसाठा

Next

कोल्हापूर : राधानगरी धरणामध्ये अवघा ०.४१ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने त्याचा परिणाम नजीकच्या काळात कोल्हापूर शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या कोल्हापूर शहराला दररोज सुमारे ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याचा शिल्लक साठा किमान १५ जूनअखेरपर्यंत पुरविण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर शहरात भागनिहाय एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे, तसेच शेतीसाठी पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे राधानगरी धरणातील पाणी पातळी कमालीची खालावली आहे. सुमारे ९ टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या राधानगरी धरणातही सध्या कमालीची पाणीपातळी कमी झाली आहे. सन १९७२ च्या दुष्काळात राधानगरी धरणात सुमारे १.५६ टीएमसी पाणीसाठा होता, पण सध्या त्यापेक्षाही दोन फुटांनी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर पाणीपातळी ही २७५.७७ फूट इतकी आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त आहे.
दरम्यान, राधानगरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा केवळ वीस दिवस पुरण्याइतपत असल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपसा बंदी जाहीर केली असली तरीही पंचगंगा नदीमार्गे मागणीप्रमाणे फक्त पिण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
राधानगरी धरण साठा जादा असताना संपूर्ण शहराला सुमारे १२० एमएलडी पाणीपुरवठा दररोज केला जात होता; पण सध्या धरणातील पाणीसाठा दिवसें-दिवस कमी होऊ लागल्याने पाणी वापरावर नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने संपूर्ण शहरात भागनिहाय नियोजनबद्ध एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे, तर दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी विचार सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत शिंगणापूर आणि बालिंगा उपसा केंद्रातून दररोज एकूण ८० एमएलडी पाणी उपसा केला जात आहे, त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत होत आहे; पण सध्याच्या परिस्थितीत तरी संपूर्ण शहरात पाण्याची कोणतीही टंचाई दिसत नाही; पण काही दिवसात पाऊस झाला नाही तर मात्र शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे..

भविष्यात उद्भवणारी पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर शहराच्या दृष्टीने पाण्याचा उपसाही कमी करून तो १२० एमएलडीवरून ८० एमएलडीपर्यंत कमी केला आहे. एक दिवसाआड पाण्याचे तंत्र शहरवासीयांनी अवलंबले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण शहरात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू आहे. कुठेही टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही, तरीही नागरिकांनी पाणी जपून वापरावे.
- मनिष पवार,
जलअभियंता, को.म.न.पा.

०.४१ टीएमसी उपयुक्त साठा
सध्या राधानगरी धरणात १ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी फक्त ०.४१ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपयुक्त शिल्लक आहे. तो पिण्याच्या पाण्यासाठी ठेवला आहे; पण तोही पाणीसाठा अवघे वीसच दिवस पुरण्याइतपत आहे.

Web Title: Just 20 days of water storage in Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.