ग्रामपंचायत बिनविरोध केली, पण दमडीही नाही दिली; ५० लाखांची घोषणा हवेतच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:30 PM2023-08-17T13:30:43+5:302023-08-17T13:30:58+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोध
कोल्हापूर : बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधी देण्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी २७ डिसेंबर २०२० रोजी केली होती. त्याआधी आर. आर. पाटील ग्रामविकास मंत्री असतानाही अशीच घोषणा केली होती. परंतु यातील एक दमडीही आतापर्यंत मिळालेली नाही. ज्या घोषणा अमलात येत नाहीत अशा घोषणा नेते का करतात असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या घोषणेमागचा हेतू चांगला होता. राजकारणाच्या इर्षेतून गावात गटबाजी वाढते. नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्याचाही गावच्या विकासावर परिणाम होतो. त्यामुळे निवडणुका बिनविरोध करा आणि निधी मिळवा अशा या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु मुळात अशा पद्धतीने आमिष दाखवून लोकशाही राज्यात निवडणूक बिनविरोध करता येणार नाही असा सूर निघाल्याने या घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.
ग्रामपंचायतींना २५ ते ५० लाखांचा निधी
तत्कालीन ग्रामविकास मंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी स्वच्छता अभियान राबवले. त्यानंतर तंटामुक्त अभियानही राबवण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली तर ५० लाख रुपयांचा निधी अशी घोषणा केली होती. परंतु, त्याची नंतरच्या काळात कायदेशीरदृष्टया अंमलबजावणी करता आली नाही.
जिल्ह्यात ४४ ग्रामपंचायती बिनविरोध
गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ४२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातील ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. अनेक छाेट्या गावांमध्ये निष्कारण निवडणुकीचे वातावरण नको म्हणून या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आल्या.
तालुकानिहाय बिनविरोध ग्रामपंचायती
पन्हाळा - १०
राधानगरी -०८
शाहूवाडी- ०५
आजरा -०५
भुदरगड - ०५
गडहिंग्लज - ०४
चंदगड - ०३
गगनबावडा -०३
करवीर - ०१
कागल -००
शिरोळ - ००
हातकणंगले - ००
एकूण ४४
गेल्यावर्षी आमची ग्रामपंचायतीची निवडणूक आम्ही बिनविरोध केली. परंतु त्याची शासन दरबारी काहीही दखल घेतली नाही. निवडणूक बिनविरोध केली म्हणून जादा एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही. - बयाजी मिसाळ, सरपंच, आवंडी, धनगरवाडा
जरी काही मंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध झाल्यास निधी देण्याची घोषणा केली होती. तरीही कोणत्याही ग्रामपंचायतीला असा निधी मिळालेला नाही. -राजू पाेतनीस, राज्य सरचिटणीस, सरपंच परिषद