कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 06:54 PM2022-11-07T18:54:51+5:302022-11-07T19:11:46+5:30

कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

Just announcements about Kolhapur tourism, There are no basic facilities | कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

कोल्हापूरच्या पर्यटनाची 'दिशा'च न ठरल्यानं 'दशा' होण्याची आली वेळ, नुसता घोषणांचाच सुकाळ

Next

समीर देशपांडे

कोल्हापूर : साडेतीन पीठांपैकी एक पीठ म्हणून करवीर क्षेत्राची देशविदेशात ओळख. कोल्हापूरला देवताळे करू नका असे कुणीही काहीही म्हणत असले तरी अंबाबाईच्या या क्षेत्रामुळेच लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात हे वास्तव नाकारता येत नाही. परंतु अशा लाखो भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापुरात मूलभूत सुविधाही नाहीत. नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनाबद्दल एक, दोन बैठकातच केलेल्या घोषणा वाचून नागरिक पुन्हा एकदा सुखावले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात समुद्र आणि बर्फ सोडून सगळे आहे असे अभिमानाने सांगितले जाते. परंतु आहे ते टिकवणे, ते पाहण्यासाठी बाहेरून येणाऱ्यांना चांगल्या मूलभुत सुविधा देणे, त्यासाठीचे स्पष्ट फलक लावणे आणि कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात फिरायला येणाऱ्यांना सुलभ कसे वावरता येईल याची दक्षता घेण्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आणि प्रशासन कमी पडले आहे हे मान्य करायला पाहिजे.

शाहू महाराजांचे जन्मस्थळ जिथे आम्ही दहा वर्षे पूर्ण करू शकत नाही तिथे बाकीच्या प्रकल्पांची काय कथा. भवानी मंडपातील लाईट अँड साऊंड प्रकल्प कधी प्रत्यक्षात आला नाही. पन्हाळ्यावरील दगडी बांधकामात उभारलेले कन्व्हेन्शन सेंटर अजूनही धूळखातच पडून आहे, पंचगंगा नदी घाटाचे संवर्धन रेखाचित्रामध्येच पाहावे लागत आहे, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा फ्लेक्सवरच राहिला आहे. मग कोल्हापूरजवळ १० किलोमीटरवर एक संन्यासी जे ‘वेगळं विश्व’ उभं करू शकला आणि ते पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक तिथे येत आहेत हे त्यांचं यश आहे की महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे याचाही विचार करायला हवा.

खड्ड्यांवरून पुढारी, अधिकाऱ्यांचा उद्धार

यंदा पावसाळा लांबायला आणि दिवाळी यायला एकच वेळ आली. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे दर्शन पर्यटकांना झाले. कोरोनानंतर पहिल्यांदाच अशी दिवाळी आल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापूरला आले. तेथून कोकणाकडे गेले. परंतु परत आपल्या घरी जाताना कोल्हापूरचे नेते आणि अधिकाऱ्यांचा उद्धार करत गेले एवढे मात्र निश्चित. बिंदू चौकातील पार्किंगच्या ठिकाणी अर्धा तास थांबून जर त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असत्या तर खड्ड्यांमुळे कोल्हापूर प्रतिमा बाहेर किती वाईट झाली आहे याचा अंदाज आला असता.

धड रस्ते आणि स्वच्छतागृहे हवीतच

हॉटेल व्यवसायातील एक ज्येष्ठ व्यावसायिक म्हणाले, कोल्हापूरचे पर्यटन वाढावे म्हणून नेत्यांनी काहीही घोषणा करू नयेत. कोल्हापूरचे रस्ते नीट ठेवले आणि महिलांसह सर्वांसाठी एक चांगली १० स्वच्छतागृहे उभारली तरी कोल्हापूरबद्दल एक चांगला संदेश बाहेर जाईल.

नैसर्गिक कुचंबणा

गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमधील एक आर्किटेक्ट आपल्या परदेशातील पाहुण्यांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या परदेशी पाहुण्यांना स्वच्छतागृहाची गरज भासली. तेव्हा माझी फार मोठी फजिती झाल्याचे त्यांनी सांगितले. याच अडचणी सर्वसामान्य नागरिक, पर्यटकांना रोज येत आहेत.

Web Title: Just announcements about Kolhapur tourism, There are no basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.