फक्त दंडामुळे तस्कर मोकाट
By admin | Published: August 5, 2015 12:07 AM2015-08-05T00:07:55+5:302015-08-05T00:07:55+5:30
जैवविविधतेला धोका : राधानगरी अभयारण्य तस्करीचे केंद्र, वनौषधींची लूट सुरूच
फक्त दंडामुळे तस्कर मोकाट
जैवविविधतेला धोका : राधानगरी अभयारण्य तस्करीचे केंद्र, वनौषधींची लूट सुरूच
राधानगरी : देशातील अतिसंवेदनशील अशी ओळख असलेले राधानगरीचे अभयारण्य काहींच्या हव्यासापोटी तस्करीचे केंद्र बनत आहे. दुर्मीळ वनौषधी, प्राणी, पक्षी यांची मुबलकताच आता या अभयारण्याच्या मुळावर उठत आहे.
बिबट्यासारख्या प्राण्यांच्या हत्येपासून चंदन, नरक्या, खैर, पाली असन, सागवान, निलगिरी, अॅकेशिया यांसारख्या मौल्यवान लाकडांच्या तस्करींचे शेकडो गुन्हे घडतात. काही तस्करांना अटक होते; पण ते जामिनावर सुटतात. न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते; पण कोणलाही शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. परिणामी निर्ढावलेले तस्कर पुन्हा-पुन्हा तेच धंदे करतात. असे चक्रच सुरू आहे. याला वन्यजीव विभागाचा निष्काळजीपणाही कारणीभूत ठरत आहे.
शाहू महाराजांनी दूरदृष्टीने दाजीपूर परिसरातील जंगल राखीव म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर १९५४ मध्ये याला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. यामुळे या परिसरात वनसंपदेत प्रचंड वाढ झाली. मुख्यत: गव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या जंगलात बिबट्या, अस्वलांसह शेकडो प्रकारचे पक्षी, दुर्मीळ वृक्ष, वनस्पतींतील जैवविविधतेत मोठी वाढ झाली आहे. जंगलातील मध, हिरडा, तमालपत्री, जळाऊ लाकडे यांच्यावर अभयारण्यातील वाड्यांचा उदरनिर्वाह चालत होता. विस्तारित अभयारण्य झाल्यावर यावर निर्बंध आले. अनेकांनी उपजीविकेसाठी अन्य मार्ग निवडले.
तस्करीमुळे जंगलासह परिसरातील चंदनांचे अस्तित्व संपले. नरक्याचीही तीच गत झाली. खैर दुर्मीळ झाला. सागवान, निलगिरी, अॅकेशिया यांच्या तस्करीत तुलनेत कमी पैसे व जास्त कष्ट आहेत. त्यामुळे आता नवीन वनस्पतींचा शोध सुरू आहे. पाली, असनसह आणखी काहींचा आता नंबर आला आहे. वन्यप्राण्यांची शिकार ही बाब आता नियमित झाली आहे. स्थानिकांसह बाहेरच्या व्हीआयपींची ऊठ-बस त्यासाठी वारंवार सुरू असते.
दहा वर्षांपूर्वी कोल्हापुरात बिबट्याचे कातडे विकणाऱ्यांना अटक झाली होती. याचा शोध घेतल्यावर ही शिकार येथील पाटपन्हाळा परिसरात झाल्याचे स्पष्ट झाले. शिकारीही सापडले. गुन्हा दाखल झाला. त्यांना अटक झाली. जामिनावर सुटले; पण पुढे त्याचे काय झाले ते उघड झाले नाही. अशीच स्थिती सर्व प्रकरणांत आहे. नरक्या, चंदन, सागवान यांच्या चोरट्या तोडीचे शेकडो गुन्हे दाखल आहेत; पण आतापर्यंत कोणालाही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. वन्यजीव विभागाचे कायदे फार कडक आहेत, असे म्हटले जाते; पण त्याचा प्रत्यय फारसा येत नाही. परिणामी अनेकजण वारंवार पकडले जाऊनही पुन्हा पुन्हा याच उद्योगात येण्याचे धाडस करीत आहेत.
वन्यजीव विभागाच्या कार्यक्षमतेवरच या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभा राहत आहे. जप्त होणाऱ्या वनमालाची बाजारात लाखांत असणारी किंमत पंचनाम्यात मात्र हजारांत येते. इथूनच संगनमताची सुरुवात होते. कारण जप्त मालाच्या किमतीवर कारवाई अवलंबून असते. कमी किमतीचा माल असल्यास केवळ दंडात्मक कारवाईवर आरोपी सुटतात. जप्त वाहने मात्र जाग्यावर सडतात.
स्थानिकांचा समावेश
गेल्या पंधरा-वीस वर्षांत बाहेरून येणाऱ्या अनेकांची येथील जैवविविधतेवर वक्रदृष्टी पडली आहे. स्थानिकांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांच्याकडून जंगलातील औषधी, दुर्मीळ वृक्षांची तोड केली जात आहे.
सुरुवातीस चंदन, नंतर नरक्या, खैर, तमालपत्री, सागवान, निलगिरी, पाली असन, अॅकेशिया यांसारख्या मौल्यवान वृक्षांची तस्करी केली जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या पैशांमुळे आता स्थानिकांनी यात शिरकाव केला आहे. अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत.
परिसरातील काही बड्यांचा यात सक्रिय सहभाग आहे. यातून मिळविलेल्या पैशांतून अनेकांनी राजकीय बस्तान बसविले आहे. नुकत्याच एका प्रमुख राजकीय नेत्याला तस्करीप्रकरणी अटक झाली. त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.