बस्स ! आता रडायचं नाय... लढायचं

By admin | Published: October 16, 2016 12:07 AM2016-10-16T00:07:43+5:302016-10-16T00:07:43+5:30

मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं : ऐतिहासिक दसरा चौकात धडाडली रणरागिणींच्या वक्तृत्वाची तोफ

Just boss! Now crying ... fight | बस्स ! आता रडायचं नाय... लढायचं

बस्स ! आता रडायचं नाय... लढायचं

Next

कोल्हापूर : कोपर्डीत १६ वर्षांच्या निष्पाप मुलीवर झालेला अत्याचार, दोषींना शिक्षा ठोठावण्यात होत असलेला वेळकाढूपणा, अट्रॉसिटी कायद्याचा होणारा गैरवापर, शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
आरक्षण नसल्याने मराठा समाजातील मुलांची होणारी होरपळ या सगळ््या संतापाला शनिवारी सकल मराठा क्रांती मूक मोर्चाने वाट करून दिली. आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी पुतळ््यासमोर कोल्हापूरच्या पाच रणरागिणींच्या वक्तृत्वाच्या तोफा धडाडल्या.
गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरू असलेला मराठा क्रांती मूक मोर्चा शनिवारी कोल्हापुरात निघाला. ‘न भूतो, न भविष्यती’ निघालेल्या अशा या मोर्चाचे नेतृत्व केले कोल्हापूरच्या रणरागिणींनी. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामित्वाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक दसरा चौकात दुपारी साडेबारा वाजता सई कुंडलिक पाटील (दोनवडे), प्रज्ञा प्रदीप जाधव (नवे पारगाव), तेजस्विनी संजय पांचाळ (कोल्हापूर), शिवानी नानासाो जाधव, स्नेहल दिलीपराव दुर्गुळे या कोल्हापूरच्या पाच कन्यांनी आपल्या भाषणांतून मोर्चामागील उद्देश विशद केला.
सई पाटील म्हणाली, स्वातंत्र्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे. रयतेचे राज्य स्थापन करून माणुसकीचा, समानतेचा भगवा झेंडा फडकावला त्या महाराष्ट्रात आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत झालीच कशी, कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशांचा माझ्या राजांनी कडेलोट, शिरच्छेद केला असता. आता त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे. आता रडायचं नाही, लढायचं. मागे हटायचं नाही, मराठा आरक्षण मिळवायचं.
स्नेहल दुर्गुळे म्हणाली, कोपर्डीतील बहिणीच्या अखेरच्या श्वासाने आम्ही बांधलो गेलो. क्रांतीसाठी रक्ताचा इतिहास लागतो, असे म्हणतात; अशा किती बहिणी आणि शेतकऱ्यांची आत्महत्या अपेक्षित आहे. मराठा समाज आतापर्यंत देणारा होता आता मागणारा झालाय, पण ओरबडणारा नाही म्हणूनच हा मूकमोर्चा. गुणवत्ता नसेल तर खुशाल शिक्षणाची दारे बंद करा पण आरक्षण नाही म्हणून आता माघार नाही. अट्रॉसिटीच्या कायद्यात खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर तीव्र कारवाई झालीच पाहिजे. त्याचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायला पाहिजे.
शिवानी जाधव म्हणाली, लाखोंचे विक्रम मोडत जिल्ह्या-जिल्ह्यांत निघणारे मराठ्यांचे मोर्चे कोणाला भीती घालण्यासाठी
नाही. मोर्चात चालणारी माणसं
फक्त शेतकऱ्यांची कोंडी फोडू मागताहेत. १६ वर्षांच्या
बहिणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या म्हणतोय
आणि प्रत्येक गोष्टीत डावलल्या जाणाऱ्या मराठ्यांना आरक्षण द्या म्हणतोय.
तेजस्विनी पांचाळ म्हणाली, कोपर्डीच्या मुलीने आपल्याला एकत्र आणले. अट्रॉसिटी कायदा पूर्णपणे रद्द व्हावा, अशी आमची मागणी नाही पण त्याचा गैरवापर होता कामा नये, यासाठी तत्काळ सुधारणा करा. हा मूक मोर्चा असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. ही शांतता आहे तोपर्यंतच काय तो निर्णय घ्या, नाही तर एकदा का वादळ पेटलं तर कळायचं बी नाय काय होईल ते. आता इंग्लिशमध्ये सांगणार नाय तर अस्सल झणझणीत, सणसणीत कोल्हापुरी रांगड्या भाषेत सांगणार. ‘अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी समद्यांच्या म्होरं,
आम्हा मराठ्यांची पोरं, छत्रपती शिवराय, शाहूराजेंचे इचार थोर समद्यांच्या म्होरं आम्ही मराठ्यांची पोरं.’
प्रज्ञा जाधव म्हणाली, एकमेकांशी खूप भांडलो, आपसांत खूप लढलो, अनेकांनी वापर केला, अनेकांचा प्रचार केला, अनेकांची ढाल झालो, अनेकांच्या मागं धावलो. आता हे घडणार नाही, मराठा बळी पडणार नाही. शब्दांना आग आली आहे. जिजाऊंची लेक जागी झाली आहे. आता मराठाच
मराठ्यांना वाचवेल, यशाच्या शिखरांपर्यंत पोहोचवेल, दाखवू पुन्हा जगाला, काय असतो धाक मराठा, एक मराठा : लाख मराठा.
कोल्हापूरच्या या रणरागिणी कन्यांचे भाषण झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रगीताने मूक मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Just boss! Now crying ... fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.