बसमालकांच्या घरी जाऊन स्कूल बसची तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:44 AM2018-06-29T04:44:25+5:302018-06-29T04:44:29+5:30
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट
कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या बसला अपघात झाल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. तपासणीसाठी वारंवार मुदत देऊनही न आलेल्या स्कूल बसेसची तपासणी त्या बसमालकांच्या थेट घरी जाऊन करण्याचे आदेश गुरुवारी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिले. ही तपासणी मोटार वाहन निरीक्षक करणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची पुनर्तपासणी शाळा सुरू होण्यापूर्वी ३१ मे अखेर प्रादेशिक परिवहनकडून करून घेणे स्कूल बसमालकांना बंधनकारक केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ७५० स्कूल बसेसच्या मालकांपैकी २०० बसेस मालकांनी ही पुनर्तपासणी अद्यापही केलेली नाही. तपासणी न केलेल्या या बसमालकांना प्रादेशिक परिवहनने नोटीसही बजावली आहे. तरीही अनेकांनी तिला प्रतिसाद दिलेला नाही.
याच पार्श्वभूमीवर, अधिकाºयांच्या बैठकीत त्या बसमालकांच्या घरी थेट जाऊन त्यांच्या बसेसची तपासणी करण्याचे आदेश प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी दिले.
दोषी आढळणाºया अशा वाहनांवर कठोर कारवाईही हे कार्यालय करणार आहे. या बसेसमध्ये स्पीड गव्हर्नर, अग्निशमन यंत्र, आसनक्षमता, प्रशिक्षित चालक, पुरुष व महिला सहायक आहेत की नाहीत. सुरक्षेचे उपाय, काचांची स्थिती, टायर, आदींचीही तपासणी केली जाणार आहे. थेट बसेस मालकांच्या घरोघरी जाऊन केली जाणार आहे.