गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2016 01:12 AM2016-05-21T01:12:52+5:302016-05-21T01:13:10+5:30

युवराज संभाजीराजे : शिवराज्याभिषेक सोहळ्यातून दुष्काळाबाबत प्रबोधन करणार

Just keep an alert for the fortunes | गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

गडकिल्ल्यांसाठी आता इशारा देणे बस्स

Next

कोल्हापूर : राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासासाठी सरकारला इशारा देणे बस्स झाले. आता कृतियुक्त पाऊल टाकले जाईल. याअंतर्गत सरकारच्या मदतीशिवाय आम्ही स्वत:च जागतिक वारसा समितीला राज्यातील गडकिल्ले दाखवून त्यांच्या समावेशाबाबत प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले. यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात दुष्काळाबाबत उपाययोजना म्हणून उपक्रम, प्रबोधन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वर्षीच्या ३४३ व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. तुळजाभवानी मंदिरातील बैठकीस ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. रमेश जाधव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, माजी नगरसेवक आदिल फरास, समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, आदी प्रमुख उपस्थित होते.
युवराज संभाजीराजे म्हणाले, राज्यातील गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नोंद नसल्याने त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. त्या अनुषंगाने गड-किल्ल्यांची नोंद व्हावी म्हणून जागतिक वारसा समितीच्या डॉ. शीखा जैन यांच्याशी चर्चा केली आहे. किल्ले पाहण्यासाठी दि. २४ मे पासून डॉ. जैन या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे; पण, छत्रपती शिवराय यांचे केवळ नाव न घेता त्यांचे विचार कृतीतून मांडण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सोहळ्यावेळी रायगडावर प्रत्येक शिवभक्ताने शिस्त पाळावी.
डॉ. जाधव म्हणाले, संभाजीराजे यांचे कार्य राजकारणविरहित आहे. त्यातून शिवराज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव बनला आहे. इंद्रजित सावंत म्हणाले, छत्रपती शिवराय यांचे नाव घेऊन मोदी सरकार सत्तेत आले; पण त्यांनी किल्ल्यांच्या विकासासाठी काहीही केलेले
नाही. या सरकारला जागे करण्याची जबाबदारी युवराज संभाजीराजेंनी घ्यावी.
त्या दृष्टीने रायगडावरून कृती कार्यक्रम जाहीर करावा. बैठकीत माणिक मंडलिक, बाबा महाडिक, आदींनी सूचना मांडल्या. यावेळी शाहीर दिलीप सावंत, आझाद नायकवडी, राम पाटील, फिरोजखान उस्ताद, संजय पोवार, विनायक फाळके, आदी उपस्थित होते. शहाजी माळी यांनी स्वागत केले. हेमंत साळोखे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील गडकिल्लेप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)


पन्हाळगडापासून पाहणीचा प्रारंभ
महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या पाहणीची सुरुवात डॉ. जैन या मंगळवारी (दि. २४) पन्हाळागडापासून करणार असल्याचे युवराज संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, पन्हाळ्यानंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड, शिवनेरीची त्या पाहणी करतील. यानंतर दि. २६ मे रोजी मंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत, तर दि. २७ मे रोजी सर्व दुर्ग संवर्धन संघटनांसमवेत त्यांची बैठक होणार आहे.

मानधन, एक हजार किलो तांदूळ
या बैठकीत नगरसेविका हसिना फरास, नगरसेवक महेश सावंत, संदीप कवाळे यांनी महानगरपालिकेचे आपले एक महिन्याचे मानधन तर, महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी एक हजार किलो तांदळाची मदत जाहीर केली. पर्यावरण जपावे. ग्रामीण भागात सोहळा पोहोचावा. रायगडला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. गडावरील बुरूजांवर चढून त्यांची मोडतोड करणाऱ्यांना रोखावे, अशा सूचना बैठकीत काही शिवभक्तांनी केल्या.

Web Title: Just keep an alert for the fortunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.