पावसाच्या दडीने चिंता वाढली: दिवसभर एक थेंबही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 05:31 PM2020-07-23T17:31:21+5:302020-07-23T17:33:23+5:30
ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले.
कोल्हापूर: ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले.
जुलै महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली आहे, संपूर्ण जून महिना पाऊस पडल्याने पावसाची ही उसंत बरी वाटली, पण त्यानंतर मात्र तरणा नक्षत्र संपून गेल्या रविवार पासून म्हातारा पाऊस सुरू झाला तरी पावसाची दडी कायम आहे. तरणा नक्षत्र संपता संपता चार दिवस सलग झालेला पाऊस एवढाच काय तो दिलासा. त्यानंतर गेले आठ दहा दिवस पाऊस गायबच आहे.
म्हातारा पाऊस हमखास पडतो म्हणून पेरण्या, रोपलागण पूर्ण केली गेली.आता पिके वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली आहेत.
गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार गगनबावडा 3, शाहूवाडी 2, शिरोळ 1 आणि आजरा व हातकणंगले येथे अर्धा मिलिमीटर असा केवळ 7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही पाऊस निरंक आहे.
गुरुवारी दिवसभर सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते, पण एक थेंबही पडला नाही, हवेत मात्र सकाळ पासूनच कमालीचा उष्मा जाणवत होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.