आभाळच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय -: ठेकेदारांवर नियंत्रण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:23 PM2019-11-27T15:23:32+5:302019-11-27T15:24:11+5:30
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील सर्वच रस्ते अक्षरश: धुऊन गेले असताना पॅचवर्क करण्याच्या महापालिकेच्या कामावर जोरदार टीका करताना शिवसेनेने मंगळवारी ‘आभाळंच फाटलंय, ठिगळं कुठं जोडताय’ अशा शब्दांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना सवाल विचारला. रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, असा आग्रह शिवसैनिकांनी आयुक्तांकडे धरला. ठेकेदारांच्या मनमानीमुळे रस्ते खराब होतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवा, असेही ठणकावून सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरातील खराब रस्ते, अमृत योजनेतील ड्रेनेजलाईन व जलवाहिनी टाकण्याची रखडलेली कामे, डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे धोक्यात आलेले नागरिकांचे आरोग्य या प्रश्नावर मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची भेट घेऊन चर्चा केली.
जिल्हा प्रमुख पवार व हर्षल सुर्वे यांनी शहरातील खराब रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत तसेच त्यांच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता असताना त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे सांगून पवार यांनी मध्यवस्तीतील सर्वच रस्ते पूर्णत: उखडले आहेत. खराब रस्ते नव्यानेच करावेत. जे रस्ते दोष दायित्व कालावधीत खराब झाले, ते संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावेत, ज्या ठिकाणी पॅचवर्क होणार आहे, ती कामे तातडीने सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.
अमृत योजनेतील काम घेतलेला ठेकेदार नगरसेवकांना दाद लागू देत नाही. नगरसेवकांचे ऐकत नाही. जर ठेकेदार उर्मट वागत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही सरळ करतो, असे पवार यांनी सांगितले. सर्वच ठेकेदारांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. कचºयाला आग लागल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्याची गांभीर्याने दखल घ्या, असे पवार म्हणाले.
प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी महापालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कामाचे कसे नियोजन केले याची माहिती दिली. ठेकेदारासह खात्यांतर्गत रस्त्यांची कामेही आज, बुधवारपासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले, तर आयुक्त कलशेट्टी यांनी साप्ताहिक बैठकीत रस्त्यांच्या कामाचा दर्जा तसेच झालेल्या कामांचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले. शिष्टमंडळात नगरसेवक राहुल चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, शिवाजीराव जाधव, प्रवीण पालव, शशिकांत बिडकर यांचा समावेश होता. यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
- ताराराणी यांचे चित्र कचरा गाडीवर?
महापालिकेने नवीन घेतलेल्या कचºयाच्या वाहनांवर करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा फोटो असल्याची बाब संजय पवार यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. हा करवीरकरांचा अपमान आहे. कचºयाच्या वाहनांवर कशाला पाहिजे असा फोटो, अशी विचारणा करत आजच्या आज हे फोटो काढायला सांगा, अशी मागणी पवार यांनी केली.
कोल्हापुरातील खराब रस्त्यांसह इतर प्रश्नांवर शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याशी चर्चा केली. यावेळी दत्ताजी टिपुगडे, राहुल चव्हाण, शिवाजीराव जाधव, हर्षल सुर्वे, शशिकांत बिडकर उपस्थित होते.