फक्त मुहूर्ताची प्रतीक्षा!
By admin | Published: May 26, 2014 01:09 AM2014-05-26T01:09:39+5:302014-05-26T01:14:04+5:30
कोणत्याही क्षणी टोलधाड : पोलीस यंत्रणा सज्ज; ‘आयआरबी’ची तयारी बाकी
कोल्हापूर : शहरात कोणत्याही क्षणी टोल सुरू होण्याची शक्यता आहे. टोलसाठी आवश्यक संरक्षण देण्याची तयारी पोलीस प्रशासनाने केली आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आयआरबीने मागणी क रताच संरक्षण दिले जाणार आहे. आयआरबी व पोलीस यंत्रणा दोन्हींकडून टोलवसुलीची तयारी पूर्ण झाल्याने आता टोलसाठी फक्त मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून टोल सुरू होणार असल्याची शहरवासीयांत चर्चेला उधाण आले आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर आयआरबीने टोलवसुलीची तयारी सुरू केली. सुरुवातीस पोलीस प्रशासनास बंदोबस्त पुरविण्यासाठी पत्रव्यवहार केला. प्रथम लोकसभा निवडणूक व त्यानंतर नाक्यांवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना पायाभूत सुविधा पुरविण्यावरून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त देण्यास असमर्थता दर्शविली. पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे सुविधा पुरविण्याची आयआरबीने तयारी पूर्ण केली आहे. आयआरबीने कोणत्याही परिस्थितीत पाऊस सुरू होण्यापूर्वी ३० मेपूर्वी टोल सुरू करण्याची व्यूहरचना आहे. न्यायालयाचा कौल बाजूने लागल्याने टोलवसुली सुरू करावीच लागेल. यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. आयआरबीच्या वरिष्ठांकडून टोलवसुली सुरू करण्याबाबत आदेश येताच शहरातील टोलवसुली सुरू करण्यात येईल. टोलवसुली सुरू होणार हे शंभर टक्के खरे असले तरी कधीपासून ते नेमके सांगता येणार नाही. मात्र, लवकरच टोलवसुली सुरू केली जाईल, असे आयआरबीने मनोज चौधरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)