कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क द्या : पानसरे

By admin | Published: September 29, 2014 12:55 AM2014-09-29T00:55:58+5:302014-09-29T01:17:20+5:30

वेतन कपातीचा निर्णय थांबविण्याची मागणी : कर्मचाऱ्यांचा ‘केडीसीसी’वर मोर्चा

Justice, rights to employees: Pansare | कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क द्या : पानसरे

कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क द्या : पानसरे

Next

कोल्हापूर : ‘कायद्याने मिळालेला हक्क डावलणाऱ्या प्रशासकांचा धिक्कार असो’, ‘अन्याय करणाऱ्या प्रशासकांची उचलबांगडी झालीच पाहिजे’, ‘हमारी युनियन हमारी ताकद’, अशा घोषणा देत वेतनकपातीचा निर्णय थांबवा यासह विविध मागण्यांसाठी आज, रविवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (केडीसीसी) कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. आमच्या मागण्या नैतिक, कायद्याला धरून आहेत. त्या मान्य करा अन्यथा २० दिवसांनी ‘काम बंद’ आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला.
येथील बिंदू चौकात सकाळी दहा वाजता ‘केडीसीसी’चे कर्मचारी जमले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे आणि बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू झाला. हातात लाल बावट्याचे ध्वज आणि घोषणा देत मोर्चा निघाला. आईसाहेब महाराज चौक, शाहूपुरी तिसरी गल्लीमार्गे केडीसीसी बँकेजवळ मोर्चा आला. तेथील ‘डाएट’च्या दारात आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारला. याठिकाणी त्यांनी पुन्हा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर निषेध सभा सुरू झाली.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे म्हणाले, बँकेच्या वाईट परिस्थितीला कर्मचारी जबाबदार नसून प्रशासकांच्या आधी बँक चालविणारे जबाबदार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत. प्रशासकांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा निर्णय घेतला जात आहे. बँक चांगली चालावी अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे बँकेचे ‘काम बंद’ पडू नये यासाठी आज सुटीदिवशी मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क द्यावा तसेच मागण्यांबाबत लवकर सकारात्मक निर्णय व्हावा. अन्यथा २० दिवसांनी बँकेच्या कामावर विपरीत परिणाम होईल, अशा स्वरूपातील आंदोलन केले जाईल. त्याची सूचना देण्यासाठी आजचा मोर्चा काढला आहे.
अतुल दिघे म्हणाले, प्रशासकांचा मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीची चर्चा बंद झाली पाहिजे. आमच्या मागण्यांच्या मान्यतेसह प्रश्न लवकर सोडविले नाहीत, तर आंदोलनाचे स्वरूप तीव्र केले जाईल.
यावेळी भगवान पाटील, दामोदर गुरव, सुरेश सूर्यवंशी, पी. एच. पाटील, अरविंद कुरणे आदींची भाषणे झाली. मोर्चात दीड हजारांहून अधिक महिला, पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी ज्येष्ठ कामगार नेते पानसरे यांनी घोषित केलेल्या आंदोलनाच्या पुढील टप्प्यास एकमुखी मान्यता दिली. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाकडून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांनी निवेदन स्वीकारले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Justice, rights to employees: Pansare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.