लोकशाही दिनात महिलांना न्याय

By admin | Published: May 18, 2015 11:34 PM2015-05-18T23:34:38+5:302015-05-19T00:24:08+5:30

वाढता प्रतिसाद : अधिकाऱ्यांकडून योग्य सल्ला, प्रकरणे निकाली निघण्याचे प्रमाण जास्त

Justice of women in democracy day | लोकशाही दिनात महिलांना न्याय

लोकशाही दिनात महिलांना न्याय

Next

कोल्हापूर : घरात नवरा आणि नणंदेकडून होणारा मानसिक, शारीरिक छळ, नवऱ्याच्या संपत्तीत पत्नी म्हणून हवा असलेला अधिकार, स्वत:च्या मुलाने घराबाहेर काढल्याने निर्माण झालेला निवाऱ्याचा प्रश्न, रस्त्यावर बसून साहित्यांची विक्री करताना गाळेधारकांकडून दिला जाणारा त्रास, ठेव मिळावी म्हणून सुरू असलेले प्रयत्न. दैनंदिन जीवनातील अशा असंख्य अडचणींची कैफियत महिलांनी सोमवारी लोकशाही दिनात निर्भीडपणे मांडल्या. गेल्या दोन वर्षात जवळपास ८० टक्के तक्रारदार महिलांना यात न्याय मिळाला आहे.
उपजिल्हाधिकारी (महसूल) किरण कुलकर्णी यांनी महिलांचे म्हणणे ऐकले आणि त्यांना योग्य तो सल्लाही दिला. दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या दरबारात १२ महिलांनी दाद मागितली.
भारतात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कमी-अधिक प्रमाणात महिलांना अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागते, पण दाद कोणाकडे मागायची, मागितलीच तर न्याय कधी मिळणार अशा अनेक प्रश्नांमुळे महिला तक्रार द्यायलाच पुढे येत नाहीत. महिलांची ही अडचण लक्षात घेऊन शासनाने एप्रिल २०१३ मध्ये महिला लोकशाही दिनाला सुरुवात केली. दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हा दिन आयोजित केला जातो. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या लोकशाही दिनासाठी महसूल, महापालिका, पोलीस प्रशासन अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित असतात. आलेल्या अर्जांनुसार एक-एक महिलेला बोलावले जाते आणि तिची कैफियत ऐकली जाते. हा प्रश्न कोणत्या विभागाच्या अखत्यारित येतो हे पाहून त्या विभागाला वर्ग केला जातो. त्याचवेळी आलेल्या महिलेला समुपदेशन आणि तिने पुढे काय करावे, यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते.
सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान महिला लोकशाही दिनाची सुरुवात झाली. कुरुंदवाडमधून एक मुलगी दाद मागण्यासाठी आली होती. घरात आई-मुलगी दोघीच असल्याने आईने चार वर्षांचा करार करून एका माणसाला जमीन कसण्यासाठी दिली. मुदत संपल्यानंतरही माणूस जमिनीवरचा हक्क सोडायला तयार नाही उलट धमक्या देतोय, शहरातील मध्यवर्ती परिसरात एका दुकानगाळ््यासमोर बसून महिला किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करतेय पण तिला गाळेधारकाने त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पदरात दोन मुलं आहेत व्यवसाय नाही केला तर पोट कसं भरू, असा तिच्यासमोर प्रश्न होता. शिवाजी पेठेतील एका पतसंस्थेत एक महिला आणि मुलीच्या नावावर जवळपास ३ ते ४ लाखांच्या ठेवी आहे. पतसंस्था अवसायनात निघाली आहे. हे अडकलेले पैसे परत मिळावेत, अशी त्यांची मागणी होती. शेत खरेदी करताना एका महिलेची फसवणूक झाली, शेतही गेले आणि पैसेही असा तिचा प्रश्न आहे.
बोंद्रे गल्लीत एका महिलेचे मिरची कांडपचे दुकान आहे. आता दोन-तीन शेजाऱ्यांनी परस्पर या दुकानाचा त्रास होतो, अशी तक्रार दाखल केली आहे. या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल यावर सल्ला मागण्यासाठी त्या आल्या होत्या.
( प्रतिनिधी )


१०९ पैकी ८५ प्रकरणे निकाली
सुरुवातीला या महिला लोकशाही दिनाला महिलांचा अजिबात प्रतिसाद नव्हता. अनेकदा अधिकारी महिलांची वाट पाहून निघून जायचे. आता मात्र अधिकाधिक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचल्याने या दिवशी मोठ्या संख्येने महिला उपस्थित असतात. गेल्या दोन वर्षांत या दिनात १०९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत, तर २४ प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांचाही लवकर निपटारा केला जावा यासाठी संबंधित विभागाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत.



महिला लोकशाही दिनात दाखल होणारी प्रकरणे, त्यांचा होणारा निपटारा यामुळे या दिनाला आता महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रलंबित प्रकरणेही तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा
- आशिष पुंडपळ,
विधि सल्लागार अधिकारी


हौसाबार्इंची कहाणी
महिला लोकशाही दिनात दाद मागायला ९५ वय उलटून गेलेल्या हौसाबाई पोवार या आजी आपल्या मुलासोबत आल्या होत्या. आजींना तीन मुले. सर्वांत मोठा मुलगा विलास हे शहीद अशोक कामटेंचे ड्रायव्हर होते. हे कुटुंब मूळचे बाहुबलीजवळील नेज गावातले. येथे पोवार कुटुंबाची बऱ्यापैकी जमीन आहे. ती हौसाबार्इंसह तीन मुलांच्या नावावर होती. मात्र, त्यांच्या लहान मुलाने आईच्या नावचे शेत आणि राहते घरही विकले. काही दिवस त्या धनगरवाड्यात राहिल्या नंतर मोठा मुलगा कोल्हापुरात आला आता तो आईला सांभाळतोय, पण माझे आयुष्य ज्या घरात गेले तिथेच मला मरण यावे यासाठी त्या झगडताहेत.

Web Title: Justice of women in democracy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.