ज्योती मांढरे माफीचा साक्षीदार होण्यास तयार
By admin | Published: February 5, 2017 01:16 AM2017-02-05T01:16:53+5:302017-02-05T01:16:53+5:30
वाई हत्याकांड सुनावणी; सर्व हकिकत सांगण्याचे केले कबूल
सातारा : ‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप होतोय म्हणून मी खरीखुरी हकिकत न्यायालयात सांगायला तयार आहे,’ असे सांगून ज्योती मांढरे हिने आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याची कबुली न्यायालयात दिली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी प्रथमच जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून सरकार पक्षाची बाजू मांडली.
वाई येथील संतोष पोळ याने २००३ ते २०१६ या १३ वर्षांच्या कालावधीत सहा खून करून मृतदेह पुरल्याचा छडा सातारा पोलिसांनी लावला. या घटनेने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाल्यानंतर संतोष पोळ व साथीदार ज्योती मांढरे या दोघांना पोलिसांनी अटक केली. वाई पोलिसांनी या घटनेचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सकाळी साडेअकरा वाजता अॅड. उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षाची न्यायालयात बाजू मांडली. त्यानंतर ज्योती मांढरेला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलविले. यावेळी न्यायमूर्तींनी ‘तू माफीचा अर्ज दिला आहेस का? तूला माफी कबूल आहे का?,’ असे विचारले. त्यावर ज्योती मांढरे म्हणाली, ‘मी केलेले पाप आणि संतोषने केलेले गुन्हे मी न्यायालयात सांगायला तयार आहे.’ ‘तू हे सगळं का सांगणार,’ असे न्यायाधीक्षांनी विचारल्यानंतर ज्योतीने ‘मला रात्रभर झोप येत नाही, सगळं माझ्या चेहऱ्यापुढं दिसतं म्हणून मी खरीखुरी हकिकत न्यायालयात सांगायला तयार आहे,’ असे सांगितले.
दरम्यान, वाई हत्याकांड प्रकरणातील ६ पैकी ३ खुनांमध्ये ज्योतीचा समावेश असल्याचे अॅड. निकम यांनी न्यायालयात सांगितले. हा सर्व खटला परिस्थितीजन्य असल्याने ज्योती मांढरे हिला न्यायालयाने माफीचा साक्षीदार करावे. पोळ हा मुख्य आरोपी असल्याने या दोघांची भेट झाली, तर तो ज्योतीवर दबाव आणण्याची शक्यता लक्षात घेता या दोघांना कारागृह प्रशासनाने भेटू दिले जाऊ नये, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला.
ज्योतीने बाजू मांडल्यानंतर तिला न्यायालयातून कारागृहात नेण्यात आले. यावेळी अॅड. उज्ज्वल निकम यांनी या खटल्याच्या अनुषंगाने यापूर्वी घडलेल्या विविध घटनांचे दाखले दिले. बचाव पक्षाचे वकील अॅड. श्रीकांत हुटगीकर यांनीही यावेळी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी याबाबतची पुढील सुनावणी दि. १३ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
या हत्याकांडात संतोष पोळ हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराविषयी हरकत घ्यायचा त्याला कायदेशीर अधिकार नाही. ज्योती मांढरेला जर माफी दिली आणि तिने सर्व हकिकत न्यायालयात सांगितली, तर तिची माफी कायम राहील. न्यायालयाने माफी दिली तर या दोघांना परस्परांशी बोलण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
- अॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील