Jyotiba Chaitra Yatra 2018 डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी, यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:59 PM2018-03-30T18:59:12+5:302018-03-30T19:27:56+5:30
दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा आज शनिवारी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी डोंगराचा परिसर फुलला आहे.
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाची चैत्र यात्रा शनिवारी होत आहे. महाराष्ट्र, कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी डोंगराचा परिसर फुलला आहे.
जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा ही वर्षातली सर्वात मोठी यात्रा असते. यात्रेसाठी सात ते आठ लाख भाविक उपस्थित असतात. यात्रेनिमित्त शनिवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होईल. साडे बारा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सासनकाठ्यांचे पूजन त्यानंतर मिरवणूक होईल.
सायंकाळी साडे पाच वाजता श्रीं ची पालखी यमाई मंदिराकडे जाण्यास निघेल. सायंकाळी सात ते आठ या वेळेत पालखी यमाई मंदिरात थांबून त्यानंतर पून्हा मंदिराकडे निघेल. रात्री दहा वाजता श्रींची आरती, धुपारती होून देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले राहील.
यात्रेनिमित्त कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर आगार आणि पंचगंगा नदी घाट येथून जादा एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. पंचगंगा नदी घाटावर भाविकांसाठी निवारा शेड तसेच स्नानासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
याठिकाणाहून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे डोंगराच्या दिशेने रवाना होत आहेत. पंचगंगा नदी घाटावर अन्नछत्राचा लाभ आणि काही वेळ विश्रांती घेवून हे भाविक पुढच्या प्रवासाला निघत आहेत.
दुसरीकडे जोतिबा डोंगरावर सासनकाठ्या घेवून आलेल्या भाविकांनी अलोट गर्दी होत आहे. गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्यावतीने भाविकांसाठी नाष्टा, चहा आणि अन्नछत्राची सोय करण्यात आली आहे. तर डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे अन्नछत्र सुरू झाले आहे. याचे उदघाटन कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले.
भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मंदिर परिसरात २८ सीसीटीव्ही कॅमेरे,२ डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर तसेच देवस्थानच्यावतीने १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील भाविकांना देवाचे दर्शन व्हावे यासाठी चार स्क्रीनची सोय करण्यात आली आहे तसेच २५ वॉकीटॉकी असणार आहेत. यात्रेदरम्यान कोठेही अुनचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सोय
भाविकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी एक कोटी लिटर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शिवाय १४५ शौचालय, वीजपुरवठा खंडित झाला तर ४ फिरते जनरेटर,४२ केव्ही जनरेटर यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिरात पुरेशी फॅन व्यवस्था, दर्शन मंडपात स्मोक एक्स्ट्राक्टर बसविण्यात आले आहे.
केएमटीची विशेष बससेवा
जोतिबा यात्रेसाठी केएमटीच्यावतीने ४० बसेसची सोय करण्यात आली आहे. दानेवाडी फाटा ते श्री जोतिबा व गिरोली फाटा ते यमाई मंदिर अशी विशेष बससेवा राहील. दुचाकी व चारचाकी वाहन घेवून येणाऱ्या भाविक नागरिकांसाठी पार्कींग ठिकाणापासून श्री जोतिबापर्यंत परिवहन उपक्रमामार्फत सकाळी सहा वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत ही सेवा मोफत देण्यात येणार आहे.
या दिवशी परिवहन उपक्रमाच्या नियमित वाहतूक संचलनात सर्व मार्गावरील फ्रिक्वेन्सीत बदल होणार असल्याने दैनंदिन वाहतूक करणाऱ्या केएमटी प्रवाश्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.