Jyotiba Chaitra Yatra 2018 लाखो भाविक ‘जोतिबा’च्या चरणी लीन,चैत्र यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 06:39 PM2018-03-31T18:39:34+5:302018-03-31T18:39:34+5:30

गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, श्रींचा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक, अशा श्रध्दापूर्ण वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी (जि.कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.

Jyotiba Chaitra Yatra 2018 Lakhs of devotees participate in 'Jyotiba' lane, Chaitra yatra | Jyotiba Chaitra Yatra 2018 लाखो भाविक ‘जोतिबा’च्या चरणी लीन,चैत्र यात्रा उत्साहात

‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र याात्रा शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील जोतिबा डोंगरावर अत्यंत उत्साहात व तितक्याच श्रध्देने पार पडली. यानिमित्त श्रींची सरदारीरूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देलाखो भाविक ‘जोतिबा’च्या चरणी लीन,चैत्र यात्रा उत्साहात ‘चांगभलं’चा गजर आणि गुलालाने न्हाला डोंगर

कोल्हापूर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर, ढोल-ताशांचा नाद, गगनचुंबी सासनकाठ्या, या काठ्या लयबद्धतेने नाचविणारे मानकरी, श्रींचा अभिषेक, सरदारीरूपात सालंकृत पूजा, पालखी सोहळा, यमाई देवीचा विवाह आणि देवाचा हा उत्सव ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी आलेले लाखो भाविक, अशा श्रध्दापूर्ण वातावरणात शनिवारी वाडी रत्नागिरी (जि.कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भरपूर पाऊस पडू दे, पीक चांगले येऊ दे, शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षित राहू दे, असे साकडे देवाला घातले. भाजून काढणाऱ्या उन्हाचा तडाखा असतानाही भक्तीच्या गारव्यासाठी भाविक या सोहळ््यात सहभागी झाले.

श्री जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे कुलदैवत. या देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातील ताणतणाव, दुख, वेदना आणि संघर्षाशी दोन हात करण्याची ताकद देणारा सोहळा.

शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. त्यानिमित्त पहाटे तहसीलदार राम चोबे यांच्या हस्ते श्रींचा शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सरदारीरूपात सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा विनोद मेतके, तुषार झुगर, प्रदीप सांगळे, गजानन आमाणी यांनी बांधली. दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले.

यावेळी आमदार सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, शंभूराजे देसाई, कऱ्हाडचे आमदार बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटील (सरुडकर), वाडी रत्नागिरीच्या सरपंच रिया सांगळे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य प्रमोद पाटील, शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,‘ जोतिबा मंदिर विकासासाठी २५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी येत्या आठवड्याभरात निविदा काढण्यात येतील.

सायंकाळी साडेपाच वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सायंकाळी सात ते आठ या वेळेत पालखी यमाई मंदिरात थांबून त्यानंतर पुन्हा मंदिराकडे आली. रात्री दहा वाजता ‘श्रीं’ची आरती, धुपारती होऊन देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले.

यात्रेसाठी गेल्या तीन दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहनांसह एसटी बसेसने भाविकांचे लोंढेच्या लोंढे डोंगरावर दाखल होत होते. डोंगरावरील झाडांच्या सावलीत लावलेल्या गाड्या-बैलगाड्या, त्याला बांधलेल्या गगनचुंबी सासनकाठ्या, नैवेद्याचे जेवण, सर्वांनी मिळून मांडलेली पंगत, दुसरीकडे मंदिरासह बाह्य परिसरात ढोल, ताशा, पिपाणीच्या तालावर सासनकाठ्या नाचविणारे भाविक, काठ्यांचा तोल जाऊ नये म्हणून दोरीने ते सांभाळणारे कार्यकर्ते, गुलाल-खोबऱ्यांची उधळण आणि गुलालात न्हालेला डोंगर असे सुरेख दृश्य होते.

देवाच्या ओढीने मैलोन् मैलांचा प्रवास करून आलेल्या भाविकांच्या काळजीने जिल्हा, पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत, केएमटी, राज्य परिवहन, स्वयंसेवी संस्था या सगळ्या यंत्रणा अहोरात्र झटत होत्या. सर्व पातळीवर व्यवस्थित नियोजन झाल्याने कुठेही अनुचित प्रकार न होता यात्रा शांततेत पार पडली.

सासनकाठीची प्रतीक्षा

दरवर्षी दुपारी दीड वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होते. यंदा मात्र पालकमंत्री पाटील हे खूप लवकर मंदिरात आले.

दुपारी सव्वा बारा वाजता देवाचे दर्शन घेतल्यानंतर काही वेळ देवस्थानच्या कार्यालयाजवळ थांबले आणि लगेच उत्तर दरवाज्यासमोर सासनकाठ्यांच्या पूजनासाठी आले. त्यांच्यासोबत आमदार, शासकीय अधिकारी होते. मात्र, निनाम पाडळीची प्रथम क्रमांकाची सासनकाठी आलीच नव्हती. पाऊण तास वाट पाहिल्यानंतर ठरल्याप्रमाणे सव्वा वाजता या सासनकाठीचे आगमन झाले. पहिल्या दोन सासनकाठ्यांचे पूजन झाल्यावर त्यांच्यासह मान्यवर निघून गेले.

चेंगराचेंगरी...

मंदिराच्या दक्षिण दरवाजातून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. पालकमंत्र्यांसह सर्व व्हीआयपी बाहेर जाणार असल्याने काही काळ मंदिरातील प्रवेश थांबविण्यात आला. तोपर्यंत बाहेर मोठी गर्दी जमली. दार उघडताच लोटलेल्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली. त्यातच एका महिलेसह दोन पुरुष खाली पडले. मागून आलेला लोंढा त्यांच्यावर पडत होता. मात्र, त्यांना तातडीने उठविण्यात आले अन्यथा अनर्थ घडला असता.

 

Web Title: Jyotiba Chaitra Yatra 2018 Lakhs of devotees participate in 'Jyotiba' lane, Chaitra yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.