Jyotiba Chaitra Yatra: भक्तिभावात वर्दीही विसरली देहभान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:46 AM2022-04-18T11:46:22+5:302022-04-18T11:49:29+5:30

त्यातच त्यांनी वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक केल्याने जल्लोषात भर पडली. लहानपणीपासूनच त्यांना सासनकाठी नाचवण्याची आवड होती. पण पोलीस खात्यात नोकरीत आल्यापासून मर्यादा होत्या. पण डोंगरावरील जल्लोष त्यांना रोखू शकला नाही

Jyotiba Chaitra Yatra, Police constable Ravindra Mali danced Sasankadi | Jyotiba Chaitra Yatra: भक्तिभावात वर्दीही विसरली देहभान

Jyotiba Chaitra Yatra: भक्तिभावात वर्दीही विसरली देहभान

googlenewsNext

कोल्हापूर : एरवी हातात लाठी घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला गेले दोन दिवस जोतिबा डोंगरावरील चैत्र यात्रेतील त्या वातावरणात हलगीचा ठेका रोखू शकला नाही, त्या पोलिसाने चक्क बेभान होऊन सासनकाठी नाचवली. गुलालाच्या उधळणीत, हलगीच्या ठेक्यावर आकाशाला गवसणी घालणारी सासनकाठी हातावर, खांद्यावर, डोक्यावर नाचवत त्याने उत्साहाला उधाण भरले. कोल्हापूर मुख्यालयातील रवींद्र श्रीकांत माळी (रा. कुरुंदवाड) या पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्याच्या कलेचे कौतुक केले.

चैत्र यात्रेनिमीत्त जोतिबा डोंगरावर (वाडीरत्नागिरी) गुरुवारपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात होता. दोन दिवस अगोदरच राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक सासनकाठ्या घेऊन डोंगरावर येत होते. चांगभलंचा गजर, गुलाल खोबऱ्यांची उधळण व हलगीच्या ठेक्यावर सासनकाठ्या नाचवल्या जात होत्या. डोंगरावर भाविकांच्या अलोट गर्दीने उधाण आले होते. त्याच वातावरणात पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल रवींद्र माळी हे यमाई देवीला जाणाऱ्या मार्गावर कर्तव्य बजावत होते. त्याच्या समोरून वाजत-गाजत कितीतरी सासनकाठ्या नाचवत भाविक पुढे जात होते. दोन- दिवसांपासून त्याच वातावरणात त्यांची सासनकाठी नाचवण्याची तीव्र इच्छा होती. पण, कर्तव्यापुढे ते स्तब्ध होते.

अखेर शनिवारी दुपारी त्यांच्या कुरुंदवाड गावची माळी यांची सासनकाठी यमाई देवीच्या दर्शनासाठी जात होती. त्याच मार्गावर रवींद्र माळी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी हलगीचा ठेका त्यांना रोखू शकला नाही, पोलीस गणवेशातच ते पुढे सरकावले. गावकऱ्यांनीही त्यांना प्रतिसाद देऊन त्यांच्या खांद्यावर सासनकाठी ठेवली. मग काय, पोलीस असल्याचा त्यांना विसरच पडला, सुमारे अर्धा तासभर बेभान होऊन कधी हातात, कधी खांद्यावर तर कधी डोक्यावर घेऊन सासनकाठी मनसोक्तपणे नाचवली.

वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक

त्यातच त्यांनी वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक केल्याने जल्लोषात भर पडली. लहानपणीपासूनच त्यांना सासनकाठी नाचवण्याची आवड होती. पण पोलीस खात्यात नोकरीत आल्यापासून मर्यादा होत्या. पण डोंगरावरील जल्लोष त्यांना रोखू शकला नाही. रवींद्र माळी हे २०१४ मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस दलात भरती झाले. अंतरजिल्हा बदलीवर ते मार्च २०२१ पासून कोल्हापूर मुख्यालयात कर्तव्यावर आहेत.

पोलीस अधीक्षकांकडून कौतुक

कॉन्स्टेबल रवींद्र माळी यांचा यात्रेमध्ये सासनकाठी नाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कलेचे फोनवरून भरभरून कौतुक केले.

यात्रेत बंदोबस्ताच्या कर्तव्यावर असल्याने जल्लोषात दोन दिवस मी स्वत:ला रोखले, अखेर हालगीचा ठेका मला रोखू शकला नाही. गावची सासनकाठी वाजत-गाजत आली अन् मी देहभान विसरुन मनसोक्तपणे नाचलो - रविंद्र माळी, पोलीस कॉन्स्टेबल

Web Title: Jyotiba Chaitra Yatra, Police constable Ravindra Mali danced Sasankadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.