जोतिबा चैत्र यात्रा आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:05+5:302021-04-22T04:25:05+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमी वर गतवर्षीसुद्धा श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी शासनाने घालून ...
कोरोनाच्या पार्श्वभूमी वर गतवर्षीसुद्धा श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली होती. गेल्या वर्षी शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार यात्रेत होणारा पालखी सोहळा पारंपरिक पद्धतीला थोडा फाटा देऊन फक्त धार्मिक विधी म्हणून पार पाडला होता. यानंतर ग्रामस्थ आणि भविकांमधून नाराजी व्यक्त होत होती. यंदा सोमवारी, २६ एप्रिल रोजी चैत्र यात्रा होणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने यावर्षीसुद्धा चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांची आणि भाविकांची मते जाणून घेण्यासाठी जोतिबा डोंगर येथे यात्री निवास या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सरपंच राधा बुणे यांनी ग्रामस्थांच्या वतीने या वर्षीचा पालखी सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पार पडावा, अशी मागणी केली. या मागणीला मानाचे गावकरी, पुजारी वर्गाचे प्रतिनिधी, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी सहमती दर्शवीत पारंपरिक पद्धतीनेच पालखी सोहळा व्हावा असा जोर धरला. बैठकीला पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेडगे, करवीर आणि शाहूवाडीचे पोलीस उपविभागीय अधिकारी आर. आर. पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, उपसरपंच शिवाजीराव सांगळे, गावकऱ्यांचे प्रतिनिधी शंकर दादर्णे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.