दख्खनचा राजा जोतिबाची शनिवारी चैत्रयात्रा
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 10, 2025 19:57 IST2025-04-10T19:56:52+5:302025-04-10T19:57:39+5:30
पहाटेपासून धार्मिक विधी : डोंगरावर लाखो भाविक दाखल

दख्खनचा राजा जोतिबाची शनिवारी चैत्रयात्रा
इंदुमती सूर्यवंशी, लोकमत न्यूज नेटवर्क, जोतिबा : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकमधील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या दख्खनचा राजा श्रीजोतिबा देवाची उद्या शनिवारी वर्षातील सर्वांत मोठी चैत्रयात्रा होत आहे. यानिमित्त जोतिबा डोंगरावर गेल्या दोन दिवसांपासून लाखो भाविक दाखल झाले आहेत. गगनचुंबी सासनकाठ्या, गुलालाची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात यात्रेआधीच डोंगर न्हाऊन निघाला आहे.
जोतिबाची वर्षातील सर्वात मोठी चैत्रयात्रा उद्या संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबाचा डोंगर दुमदुमून गेला आहे. डोंगर वाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. बैलगाडी, खासगी वाहनातून, पायी चालत भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत.
असा असेल सोहळा..
१. शनिवारी मुख्य यात्रेदिवशी जोतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. पहाटे पाच वाजता पन्हाळा तहसीलदार यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल.
२.सकाळी १० वाजता धुपारती सोहळा होईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असणारी सासनकाठ्यांची मिरवणूक दुपारी १२ वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीच्या पूजनाने सुरू होईल.
३. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान इनाम पाडळी (जि.सातारा) या सासनकाठीचा असतो, त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) यांच्या मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या असतात.
४.मिरवणुकीमध्ये २० फुटांपासून ते ७० ते ८० फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. हस्तनक्षत्रावर सायंकाळी ५ वाजून ४५ वाजता जोतिबाचा पालखी सोहळा सुरू होईल. तोफेच्या सलामीने पालखी जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होईल .
५.सायंकाळी साडेसहा वाजता यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होईल. रात्री ८ वाजता जोतिबाची पालखी मंदिराकडे प्रस्थान होईल, ९ वाजता पालखी जोतिबा मंदिरातील सदरेवर विराजमान होईल. तोफेच्या सलामीने रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल. आरती, अंगारा वाटप झाल्यानंतर रात्री ११ वाजता देव मूर्तीस शाही स्नान होईल. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहील.