चैत्री यात्रेत जोतिबाचे एका तासात दर्शन
By Admin | Published: March 23, 2015 12:16 AM2015-03-23T00:16:47+5:302015-03-23T00:42:40+5:30
‘लोकमत’च्या चर्चात्मक बैठकीत सर्व घटकांचा समन्वयाचा निर्धार
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेत भाविकांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागू नये, यासाठी एका तासात देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी गाभाऱ्यात दोन दर्शनरांगा करण्यात येणार आहेत. एकाचवेळी लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता आणि स्वयंशिस्तीचा विचार करून यात्रा पार पाडण्यात जिल्हा, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, ग्रामपंचायत व देवस्थान समितीला सहकार्य करावे, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. येत्या ३ एप्रिलला दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानची चैत्र यात्रा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, वाडी रत्नागिरीच्या (जोतिबा डोंगर) सरपंच रिया सांगळे, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, तहसीलदार प्रशांत पिसाळ, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले व मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी जोतिबा मंदिर व यात्रेशी निगडित सर्व व्यवस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेची तयारी, येणाऱ्या अडचणी आणि भाविकांकडून अपेक्षा, यावर ऊहापोह केला.
दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात चर्चात्मक कार्यक्रम झाला. यात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सहजसेवा ट्रस्टचे प्रमोद पाटील, वाडी रत्नगिरीच्या (जोतिबा) सरपंच रिया सांगळे, ‘देवस्थान’चे कनिष्ठ अभियंता सुयश पाटील, सचिव शुभांगी साठे, तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी सहभाग घेतला.