जोतिबा खेट्यांची भाविकांविना सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:13 AM2021-03-30T04:13:41+5:302021-03-30T04:13:41+5:30
दख्खनचा राजा श्री जोतिबाची खेटे यात्रा २८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने ही यात्रा ...
दख्खनचा राजा श्री जोतिबाची खेटे यात्रा २८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रशासनाने ही यात्रा भाविकांसाठी स्थगित केली होती. ५ रविवार भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले होते.
पाचव्या खेट्यालाही मंदिर भविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवून मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडला. जोतिबाचा शेवटचा खेटाही भाविकांविनाच पार पडला. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून जोतिबाची खेटे यात्रा सुरू होते. कोल्हापूर व परिसरातील भाविक पायी चालत जाऊन देवदर्शन घेतात. २८ फेब्रुवारीपासून दर रविवारी मंदिर भाविकांसाठी बंदच होते. कुठल्याही मार्गाने भाविकांना मंदिरापर्यंत सोडण्यात येत नव्हते. कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. धार्मिक विधी मात्र स्थानिक पुजाऱ्यांमार्फत पूर्ण करण्यात येत होता. शेवटच्या खेट्यादिवशी हे मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद करून, धार्मिक विधी मात्र मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. भाविकांविना मंदिर परिसरात शुकशुकाट होता. रात्री होळी पूजन आणि पालखी सोहळा मोजक्याच पुजारी, मानकरी, देवसेवक यांच्या उपस्थितीत पार पडला.
व्यापाऱ्यांना आर्थिक फटका
पाच रविवार जोतिबा डोंगरावर भाविकांना येण्यास बंदी घातल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. साप्ताहिक सुट्टी आणि जोतिबा देवाचा वार असल्याने रविवारीच भाविकांची गर्दी होत असते. गर्दीचा रविवारच लॉकडाऊन केल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले.
जोतिबा स्थानिक नागरिकांनाही त्रास
जोतिबा येथील स्थानिक दूध व्यापाऱ्याला पोलिसांनी अडवून प्रवेश बंद केला. दहा लिटर दूध रस्त्यावर सांडले. काहीवेळ येथे तणाव निर्माण झाला. प्रत्येक नाक्यावर स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवून जोतिबा डोंगरावर प्रवेश दिला जात होता.
.
फोटो : १) जोतिबा मंदिरात पाचव्या खेट्यानिमित्त भाविकांविना निघालेला पालखी सोहळा.