जोतिबा मंदिर दर्शन मंडपाचे काम बंद : दहा टक्केही काम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:31 AM2020-12-16T11:31:32+5:302020-12-16T11:34:25+5:30
Jyotiba Temple, Mahesh Jadhav , kolhapur, Religious Places महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिराजवळील सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. आधी तांत्रिक कारणाने, नंतर लॉकडाऊन- कोरोनामुळे काम थांबले.
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिराजवळील सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाचे काम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. आधी तांत्रिक कारणाने, नंतर लॉकडाऊन- कोरोनामुळे काम थांबले.
आता देवस्थान समिती, ठेकेदार, आर्किटेक्ट यांच्यातील योग्य समन्वयाच्या अभावामुळे काम बंद पडले. एकीकडे निधी नसल्याने काम थांबतात, इथे मात्र निधी असूनही काम थांबल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
देवाच्या द्वारी कशाचीही कमतरता राहू नये, अशी तमाम भाविकांची मानसिकता असते, परंतु याच्याबरोबर उलटा अनुभव जोतिबा मंदिर दर्शन मंडपाच्याबाबतीत येत आहे. ज्या प्रकारे अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रदीर्घ काळ लांबला त्याच वाटेवरून जोतिबा मंदिर परिसर विकासाचे काम जात असल्याची शंका येऊ लागली आहे.
जोतिबा मंदिर परिसर विकास योजनेतून प्रामुख्याने दर्शन मंडप उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याला निधी देखील प्राप्त झाला. २० फेब्रुवारी २०१८ रोजी शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन यांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. काम पूर्ण करण्याची मुदत दोन वर्षाची होती. ती दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी संपणार आहे. काम मात्र जोथ्यापर्यंतच आले आहे.
वर्कऑर्डर मिळाल्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले. दर्शन मंडपाच्या जागी असणाऱ्या जुन्या इमारतीचे बांधकाम पाडण्यास तब्बल सात महिने गेले. काम सुरू झाले तोवर आणखी एक अपेक्षाभंग झाला. अपेक्षित नसताना पाया खुदाई वीस फुटापर्यंत करावी लागली. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करावे लागले.
पुन्हा काम सुरू होते ना होते तोच लॉकडाऊन सुरू झाले. दरम्यानच्या काळात ठेकेदाराने जोथ्यापर्यंत काम आणून आरसीसी स्लॅबचे काम पूर्ण केले. लॉकडाऊन उठल्यानंतर काही महिने काम सुरू राहिले, पण गेल्या दीड महिन्यापासून अचानक काम थांबले आहे.
कामाची व्याप्ती अशी असेल-
- वीस हजार चौरस फुटांचे बांधकाम होणार
- ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर तीन मजल्यांची इमारत.
- देवस्थान समिती, पोलीस चौकीसह टॉयलेट ब्लॉक समावेश
- काम सुरू करण्याच्या सूचना
पंधरा दिवसांपूर्वी मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दर्शनमंडपाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार यांना ठेकेदारास मंडपकाम सुरू करण्याच्या तसेच कामाची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. बिलासह अन्य कोणत्याही अडचणीमुळे काम थांबलेले नाही, अशी माझी माहिती आहे.
- महेश जाधव, अध्यक्ष,
देवस्थान समिती