६६६६..; के. चंद्रशेखर राव यांच्या ताफ्यात एकसारख्या क्रमाकांच्या २० गाड्या, कोल्हापुरात रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:54 IST2023-08-02T13:54:04+5:302023-08-02T13:54:20+5:30
पोलिसही चक्रावले. फॅन्सी नंबरचे वेड असणाऱ्या कोल्हापूरकरांना मुख्यमंत्री राव यांच्या याच वेडाचे अप्रूप वाटले

६६६६..; के. चंद्रशेखर राव यांच्या ताफ्यात एकसारख्या क्रमाकांच्या २० गाड्या, कोल्हापुरात रंगली चर्चा
कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्या गाड्यांच्या एकसारख्या क्रमाकांचीच चर्चा जास्त रंगली. या क्रमांकातील ६ हा अंक राव यांच्यासाठी लकी असून त्यामुळेच त्यांनी ६६६६ असा क्रमांक घेतल्याचे सांगण्यात आले. फॅन्सी नंबरचे वेड कोल्हापूरला अगोदरपासूनच आहे. फॅन्सी नंबरसह आपल्या आवडत्या नेत्याच्या गाडीचा क्रमांक कोल्हापूरकर वर्षाला काही कोटी रुपये भरून मिळवतात. त्यामुळे मुख्यमंत्री राव यांच्या याच वेडाचे कोल्हापूरला अप्रूप वाटले.
याआधीही राव हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येताना सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन आले होते. राव यांच्या कोल्हापूर दौऱ्यासाठी हैदराबादहून एकूण २४ गाड्या आणि ५० सुरक्षारक्षक सोमवारीच कोल्हापुरात आले होते आणि एका धर्मशाळेत थांबले होते. सकाळी राव हे विमानतळावर येण्याआधी यातील २० गाड्या एका रांगेने विमानतळावर आणून उभ्या करण्यात आल्या. मात्र या सर्व गाड्यांचा टीएस ०९ के ६६६६ हा एकच क्रमांक असल्याने पोलिसही चक्रावले.
कोणत्या गाडीला नेमके संरक्षण द्यायचे हे पोलिसांनाही कळेना; परंतु राव आले आणि आपल्या सहकाऱ्यांसह ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसले. या सर्वांसाठी ही व्हॅनिटी व्हॅन तयार ठेवण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या कार्यालयासह, भाेजन व्यवस्था, स्वच्छतागृहाचीही सोय आहे.
केवळ सुरक्षेसाठी
अशा पद्धतीने वीस गाड्यांना एकच क्रमांक देता येतात का, अशी चर्चा या निमित्तााने रंगू लागली; परंतु सुरक्षेच्या कारणावरून अशा पद्धतीने एकच क्रमांक देणे कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांसह हैदराबादहून आणलेल्या २४ गाड्यांचा समावेश होता. यामध्ये मोबाइल जॅमर वाहन होते.