Kolhapur: विधानसभेसाठी ‘राधानगरी’त मेहुण्या-पाहुण्यांनी शड्डू ठोकला, संपर्क सुरू; काँग्रेसच्यासाठी दोघांत चढाओढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:20 PM2024-06-08T18:20:19+5:302024-06-08T18:20:45+5:30

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही, तोपर्यंत राधानगरी तालुक्यात विधानसभेसाठी जोरबैठका सुरू झाल्या. माजी आमदार के. ...

K. P. Patil and A. Y. Patil started a contact campaign in Radhanagari for the Legislative Assembly | Kolhapur: विधानसभेसाठी ‘राधानगरी’त मेहुण्या-पाहुण्यांनी शड्डू ठोकला, संपर्क सुरू; काँग्रेसच्यासाठी दोघांत चढाओढ?

Kolhapur: विधानसभेसाठी ‘राधानगरी’त मेहुण्या-पाहुण्यांनी शड्डू ठोकला, संपर्क सुरू; काँग्रेसच्यासाठी दोघांत चढाओढ?

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा अद्याप खाली बसलेला नाही, तोपर्यंत राधानगरी तालुक्यात विधानसभेसाठी जोरबैठका सुरू झाल्या. माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी संपर्क मोहिमेच्या माध्यमातून शड्डू ठोकले आहेत. दोघांचेही कॉंग्रेस उमेदवारीसाठी प्रयत्न असून, आमदार सतेज पाटील कॉंग्रेसचा हात कोणाच्या हातात देतात? हे पाहणे औत्सुक्याचे असून, येथे सध्या तरी तिरंगी लढतीची शक्यता दिसत आहे.

राधानगरी, भुदरगड तालुका व आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ, अशी ‘राधानगरी’ मतदारसंघाची रचना आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत २०१४ पासून आमदार प्रकाश आबीटकर यांनी आपली पकड घट्ट केली. ‘के. पी’ व ‘ए. वाय.’ यांनी विधानसभा लढण्याची तयारी केली असली, तरी महायुती अशीच राहिली, तर उमेदवारीची अडचण येणार, म्हणून के. पी. पाटील यांनी दुसरा पर्याय म्हणून कॉंग्रेसशी जुळवून घेतले आहे. ‘बिद्री’च्या निवडणुकीपासून सतेज पाटील यांचा गट ‘के. पी.’ यांच्या सोबत आहे. 

त्यानंतर, दिवंगत आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्या माध्यमातून ‘ए. वाय.’ हेही कॉंग्रेसच्या जवळ आले आहेत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावर दबाव असतानाही त्यांनी शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देऊन ‘राधानगरी’ तालुका पिंजून काढला. दिवंगत आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील गटाला सोबत घेऊन तालुका एकतर्फी शाहू छत्रपतींच्या मागे उभा करण्याची किमया त्यांनी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मेहुण्या-पाहुणे विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. ‘ए. वाय.’ यांनी भुदरगड तालुक्यातील कडगाव येथून, तर ‘के. पी.’ यांनी राधानगरी तालुक्यातील वाकीघोळ येथून संपर्क सुरू करत शड्डू ठोकला आहे.

‘हात’, ‘मशाल’, ‘घड्याळ्या’चा पर्याय

लोकसभेतील निकालानंतर महायुती व आघाडी एकसंधपणेच विधानसभेला सामाेरे जातील, असे आताचे तरी चित्र आहे. जागा वाटपावरून ताणाताणी झाली, तर ‘राधानगरी’त कॉंग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवार शोधावा लागेल. महायुतीही स्वतंत्र लढली, तर के. पी. पाटील हे हातात ‘घड्याळ’च बांधण्याची शक्यता अधिक आहे. त्यावेळी ‘ए. वाय.’ ‘हात’ घेऊन रिंगणात असू शकतात.

Web Title: K. P. Patil and A. Y. Patil started a contact campaign in Radhanagari for the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.