बिद्रीत के. पी. पाटील यांच्या आघाडीतून ए. वाय. पाटील बाहेर; मेव्हण्या पाहुण्यांचे अखेर फिस्कटले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 10:36 AM2023-11-15T10:36:07+5:302023-11-15T10:36:58+5:30
ए. वाय .पाटील यांनी विरोधी आमदार प्रकाश आबिटकर आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
- दत्ता लोकरे
सरवडे :बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत सत्ताधारी गटातील नेते पाहुणे बिद्रीचे अध्यक्ष के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष मंगळवारी विकोपाला गेला. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागांची आणि बिद्रीचे अध्यक्षपद यावर तोडगा निघाला नसल्याने माझे आपल्याशी जमत नसल्याचा निरोप ए.वाय.पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना समोर जाऊन दिला. त्यामुळे मेव्हण्या पाहुण्यांचे बिद्रीच्या निवडणुकीत फिस्कटले, यावर शिक्कामोर्तब झाले.
ए. वाय .पाटील यांनी विरोधी आमदार प्रकाश आबिटकर आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बिद्री साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सत्तेत सहभागी असलेले ए.वाय.पाटील यांनी बैठका घेत राधानगरी तालुक्यातील गट क्रमांक एक व दोन यामधील प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा जागा व बिद्रीचे पहिल्यांदा अध्यक्षपद मिळावे अशी मागणी केली होती. यावर काही दिवसापूर्वीच मंत्री मुश्रीफ व के.पी .पाटील यांनी चर्चा करून ए .वाय. पाटील यांना तालुक्यातील गतपंचवार्षिक पेक्षा एक जागा वाढवून चार जागा देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता.
मंगळवारी शेळेवाडी येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सायंकाळी सातच्या दरम्यान मंत्री मुश्रीफ यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन ए.वाय.पाटील यांनी आपल्याला तो प्रस्ताव मान्य नाही आणि आपले तुमचे जमत नाही असा निरोप दिला त्यामुळे ही युती फिसकटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याच्या निवडणुकीत जसे काही वर्षांपूर्वी पाहुणे दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील व मेहुणे गोपाळराव पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिला तसाच संघर्ष बिद्रीच्या निमित्ताने के.पी.व ए.वाय.यांच्यात पहायला मिळणार आहे.
विधानसभेची किनार
के.पी.पाटील आणि ए.वाय.पाटील हे दोघेही राधानगरी विधानसभा मतदार संघातून अजित पवार गटातून इच्छुक आहेत. या मतदार संघात मुख्यमंत्री गटाचे आमदार आबिटकर आमदार आहेत. त्यामुळे कारखान्यासोबत विधानसभा निवडणुकीचीही या घडामोडीना किनार आहे.